ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 24 - काळेवाडी, रहाटणी भैय्यावाडीतील मोकळ्या जागेत झाडाझुडपांत एका अज्ञात व्यकतीचा जखमी अवस्थेतील मृतदेह मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आढळून आला. वाकड पोलिसांनी पंचनामा करून रूग्णवाहिकेतून मृतदेह वायसीएम रूग्णालयात नेण्यात आला. डोक्यात दगडी फरशी मारून खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यकत केला आहे.
चतु:शृंगी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने तसेच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, सहायक पोलीस निरिक्षक अभिजीत जाधव, महेश सागडे,महेंद्र कदम,महेंद्र आहेर व अन्य पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच्या पेहरावावरून बांधकाम साईटवर काम करणारा मजूर असल्याचे निदर्शनास आले आहे. लोकवस्तीपासून थोडा दूर अंतरावरचा हा परिसर आहे. निर्जन परिसर असल्याने गर्दुले,पत्ते खेळणारे, ताडी पिणारे यांचा या भागात वावर असतो. मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला. त्या ठिकाणी डोक्यात मारलेले, रक्ताने भरलेले फरशीचे तुकडे, गांजा ओढण्याची चिलिम पडलेली होती. मद्याची फुटलेली बाटली बाजुलाच पडली होती. तसेच खेळण्याचे पत्ते अस्ताव्यस्त पसरले होते. पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाºयांना घटनास्थळी पाचारण केले. आजुबाजुला चौकशी केली असता,कोणाकडूनही माहिती न मिळाल्याने ओळख पटू शकली नाही. बाजुलाच ताडी गुत्ता आहे. मंगळवारी हा ताडीगुत्ता बंद होता.
मृतदेहाच्या हातावर गोंदण
मृताच्या उजव्या हातावर श्रीमंत सिताबाई असे नाव गोदण्यात आले आहे. तर छातीवर उजव्या बाजुला संगीता असे गोंदलेले आहे. हातावर आणि छातीवर गोंदले असल्याने ओळख पटण्यास मदत होईल. असे पोलिसांचे म्हणणे आहे. आजुबाजुच्या बिल्डिंग साईटवर एखादा कर्मचारी गायब आहे का? या विषयी चौकशी केली जाणार आहे. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव- माने यांनी दिली.