देहूरोड : आई-वडिलांच्या उपकारातून उतराई होणे अशक्य आहे. आई-वडिलांसाठी जास्तीत जास्त वेळ द्या. त्यांची सेवा करा. त्यांचा आशीर्वाद हा स्वर्गाहून मोठा आहे. आई-वडिलांशिवाय संपती-सुबत्ता वांझ आहे, असे प्रतिपादन हभप लक्ष्मणमहाराज पाटील यांनी श्रीक्षेत्र घोरवडेश्वर येथील कीर्तनात केले.महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान, अखंड हरिनाम सप्ताह समिती व घोरवडेश्वर प्रासादिक दिंडी आयोजित हरिनाम सप्ताहात कीर्तन सेवा करताना पाटीलमहाराज बोलत होते. गायनसाथ हभप प्रकाशमहाराज पाटील, हभप गणेशमहाराज मोहिते, हभप भोलेशमहाराज ठाकर यांनी केली. मृदंगसाथ हभप रवींद्र चव्हाण व स्वप्निल सूर्यवंशी यांनी केली. पाटीलमहाराजांचा सत्कार देवराम भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. निर्गुण बोडके यांनी सूत्रसंचालन केले. ‘काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती’ या संत तुकाराममहाराजांच्या अभंगावर पाटीलमहाराजांनी निरुपण केले. ते म्हणाले, ‘‘कर्तव्य म्हणून केलेले उपकार फेडण्याची गरज नसते. मात्र परमात्मा, पृथ्वी, गंगा, चंद्र, सूर्य आणि आई-वडील यांचे उपकार फेडणे शक्य नाही. सध्या तरुणांना प्रबोधनाची नितांत गरज आहे. निष्ठेला फार महत्त्व आहे. मात्र संतांसारखी निष्ठा कोणाकडेच दिसत नाही. प्रपंचात ढोंगी माणसे दिसून येत असतात. नावासारखे आचरण होताना आढळून येत नाही. संतांचे उच्च दर्जाचे विचार समजण्यासाठी प्रत्येकाने कुवत, पात्रता वाढविण्याची गरज आहे. तीर्थांच्या ठिकाणी निष्ठा व श्रद्धा ठेवा, मातीशी इमान राखा, गद्दारी करू नका. एखादे चांगले काम करता आले नाही तरी चालेल, मात्र चुकीचे काम करू नका. त्याला प्रोत्साहनही देऊ नका.’’हभप यतिराजमहाराज लोहर व विलासमहाराज बागल यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायण सुरू झाले असून, त्यानंतर दुपारी स्वरांजली, माऊली, काकडेमळा महिला भजनी मंडळ व श्रद्धा काकडे यांचे भजन झाले. सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन झाले. नंतर पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी हरिजागर केला. (वार्ताहर)
आई-वडिलांच्या उपकारातून उतराई अशक्य
By admin | Published: February 21, 2017 2:31 AM