पिंपरी : परमिट संपलेल्या आणि नव्याने परमिट न चढविलेल्या रिक्षा मोटार वाहन कायद्याने स्क्रॅप ठरतात. अशा स्क्रॅप ठरलेल्या हजारो रिक्षा शहरात रस्त्यांवर धावत आहेत. या रिक्षांचा सर्रासपणे अवैध धंद्यासाठी वापर होत असून, कसलीही नोंद नसलेल्या या रिक्षांमुळे गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांना अडचणी निर्माण होत आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे ३५ हजार रिक्षा विविध रस्त्यांवर धावत आहेत. त्यातील केवळ पाच हजार रिक्षावाल्यांकडे रीतसर परमिट आहे. उर्वरित सुमारे ३० हजार रिक्षा स्क्रॅप झाल्या असताना नियमांचे उल्लंघन करून रस्त्यांवर धावताना दिसून येत आहेत. त्यातील काही रिक्षा सर्रासपणे अवैध कामांसाठी वापरात आणल्या जात आहेत. काही रिक्षांचा वापर चोरटे चोरीच्या ठिकाणी जाण्यासाठी करतात. गुंड प्रवृत्तीचे लोक हाणामारी, भांडण या साठी टोळ्या घेऊन जाण्याकरिता अशा रिक्षांचा वापर करतात. हत्यारांची वाहतूक, तसेच गावठी दारूची वाहतूक करण्यासाठीही अशाच रिक्षा वापरात आणल्या जात आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेल, लॉजवर मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालतो. या वेश्या व्यवसायासाठी महिलांची ने- आण करण्यासाठी अशाच रिक्षा वापरात आणल्या जात आहेत. भंगारात काढलेल्या रिक्षांची संख्या मोठी आहे. परमिट नसल्याने या रिक्षा रस्त्यावर आणता येत नाहीत. प्रवासी वाहतूक करण्यास या रिक्षांना मुभा नाही. (प्रतिनिधी)रिक्षा चालविणाऱ्या रिक्षा चालकांकडे परमिट तर दूरची बाब वाहन चालविण्याचा परवानासुद्धा नसतो. त्यांना गणवेश नाही. बॅच नाही, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे असे रिक्षाचलक कशाचीही पर्वा करीत नाहीत. गुन्हेगारी घटनांमध्ये असे रिक्षाचालक थेट सहभागी असतात. गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे अशा रिक्षांवर अंकुश असणे गरजेचे आहे.
बिगरपरमिटच्या ३० हजार रिक्षा
By admin | Published: May 04, 2017 2:41 AM