पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पूर्वसूचना न मिळाल्याने पिंपरी, नेहरूनगर, खराळवाडी, कासारवाडी, संत तुकारामनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. आठवड्यातून एक दिवस पाणीकपात असा दावा महापालिका करीत असली, तरी प्रत्यक्षातपणे दोन दिवस कपात होत आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला. जाहीर प्रकटनही न दिल्याने गेल्या आठवडाभरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महिलांचे नियोजन विस्कटले आहे. जलउपसा केंद्रातील कामामुळे गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. मात्र, कोणत्या भागातील पाणी नाही, ही माहिती न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. शुक्रवारी संभाजीनगर व शाहूनगर, यमुनानगर, रुपीनगर, जगताप डेअरी, तसेच कस्पटेवस्ती, विशालनगर, पिंपळे निलख गावठाण, जुनी सांगवी व नवी सांगवीतील नायडू टाक्यांवरील सर्व भाग, नेहरूनगरातील गंगानगर, महेशनगर, डी. वाय़ पाटील कॉलेज परिसर, मोशी सेक्टर चार ते सहा, गंधर्वनगरी व खानदेशनगर, पेठ क्रमांक ७ व १० येथील निवासी भाग, चºहोली येथील डॉ. डी. वाय. पाटील संकुल, काळजेवाडी, कोतवालवाडी, पठारे मळा, बुर्डे वस्ती, चºहोली गावठाण या भागात पाणीपुरवठा होत असतो. मात्र, यापैकी संत तुकारामनगर, नेहरूनगरातील काही भागात पाणी न आल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागली.आठवड्यातील दोन दिवस कपातीचा फटकाशहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आठवड्यातील एक दिवस पाणी कपातीचे धोरण अवलंबले आहे. मात्र गुरुवारी रावेत येथील जलउपसा केंद्रातील कामामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद केला होता. शनिवारी कृष्णानगर, शिवतेजनगर, घरकुल, पूर्णानगर, शरदनगर, अजंठानगर, किवळे व विकासनगर, मामुर्डी, पुनावळे रावेत गावठाण, वाकड इंदिरा कॉलेज, काळाखडक, पंडित पेट्रोलपंप, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, प्रेरणा शाळा, चिंतामणीनगरी, रेलविहार, चिंचवडेनगर, रजनीगंधा सोसायटी, नागसेननगर, संत तुकारामनगर यशवंत चौक, वल्लभनगर, मोशीतील आदर्शनगर, संत तुकारामनगर या भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद होता.मात्र, याच भागात गुरुवारीही पाणीकपातीचा सामना करावा लागला. पिण्याचे पाणी आणण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागली. मानसिक त्रास सहन करावा लागला. अनियोजनामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अनियोजनाने पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 1:25 AM