देहूरोड : हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याने सप्ताह अगर पंधरवड्यापुरता वापर न करता दररोजच्या कामकाजात व व्यवहारात सर्रास वापर वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हास्यकवी शरदेंद शुक्ला यांनी येथे केले. कॅन्टोन्मेंट बोर्डात भारत सरकारचा राजभाषा विभाग व रक्षा संपदा विभाग दक्षिण कमान यांच्या आदेशानुसार आयोजित हिंदी पंधरवड्याचे उद्घाटन शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी शुक्ला बोलत होते. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, बोर्ड उपाध्यक्षा अरुणा पिंजण, सदस्य रघुवीर शेलार, गोपाळ तंतरपाळे, हाजीमलंग मारिमुत्तू, सारिका नाईकनवरे, कार्यालय अधीक्षक श्रीकांत लष्करे, नरेंद्र महाजनी, जयश्री सिरसी, सुभाष मोरे, प्रवीण गायकवाड, किरण गोंटे आदी उपस्थित होते. हिंदी पंधरवड्यानिमित्त कॅन्टोन्मेंटच्या वतीने कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाज जास्तीत जास्त हिंदी भाषेत करावे. हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करावा याकरिता कर्मचारी व बोर्डाच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांना सुरुवात करण्यात आली आहे. हिंदी पत्रलेखन, हिंदी हस्ताक्षर, हिंदी भाषांतर, निबंधलेखन, हिंदी अनुवाद, हिंदीतून भाषण, अंताक्षरी स्पर्धा, वैयक्तिक गायन स्पर्धा, हिंदी टंकलेखन आदी स्पर्धांना सुरुवात झाली आहे. १४ सप्टेंबरला होणाऱ्या हिंदी दिनापर्यंत स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर पुण्यातील दक्षिण कमान येथे होणाऱ्या कार्यक्रमात देहूरोड, खडकी व पुणे या तीनही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यशस्वी कर्मचारी व विद्यार्थी यांना रोख बक्षिसे व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. (वार्ताहर)
हिंदीचा वापर वाढायला हवा
By admin | Published: September 08, 2016 1:18 AM