पिंपरी: राज्यात महाविकास आघाडीसाठी सकारात्मक वातावरण आहे. शिरूर आणि बारामती मतदारसंघात विरोधकांकडून मतदारांना धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसी बळाचा चुकीचा वापर केला जात आहे. विरोधकांना पराभवाची भीती वाटत असल्याने हे प्रकार सुरू आहेत, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली.
महाविकास आघाडीच्या मेळाव्यासाठी ते आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी उमेदवार संजोग वाघेरे, काँग्रेस पक्षाचे कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, एकनाथ पवार, योगेश बाबर उपस्थित होते. गद्दारीचे कीड पूर्णपणे निघून जावीराऊत म्हणाले, 'राज्यात प्रत्येक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. कारण त्यांचा जीव राज्यातील ४८ जागांमध्ये अडकला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागा देशातील चित्र बदलवू शकतात. समोर उभी असलेली लोक गद्दार आहेत. त्यांचा पराभव करणे हेच आपले ध्येय आहे. या राज्यात पुन्हा आमदार खासदार विकत घेतला जाऊ नये, गद्दारीचे कीड पूर्णपणे निघून जावी, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.''
निवडणूक आयोगावर टीका राऊत म्हणाले, निवडणूक आयोग ही भाजपची दुसरी शाखा आहे. देशात ज्या काही सांविधानिक संस्था आहे त्या स्वतःच्या ताब्यात घेण्याचे काम मोदींनी केले आहे. त्या आता सांविधानिक राहिल्या नाहीत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सरकारी फौजफाटा घेऊन एका पक्षाचा प्रचार करत आहे. हा तर खऱ्या अर्थाने आचारसंहितेचा भंग आहे.'