वडगाव मावळ : तालुक्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या वडगाव रेल्वे स्थानकाला शौचालय, रेल्वेफाटक आणि पार्किंग या प्रमुख तीन समस्यांनी ग्रासले आहे. सुसज्ज अशा स्थानकावर इतर सर्व सोयी नागरिकांसाठी असून, प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळे वापराअभावी स्थानकातील पादचारी पूल निरुपयोगी बनत चालला आहे.वडगावच्या उतरेकडील भागातील लोकांना वडगावमध्ये केशवनगर, राजपुरी, सांगावी, वारंगवाडी,कातवी आदी ठिकाणावरून रेल्वेलाइन ओलांडून रोज यावे लागते. अंदाजे २० हजार नागरिकांना जीव मुठीत घेऊन गेटमधून रेल्वेलाइन ओलांडावी लागते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात. विद्यार्थी, नोकरदार, दुग्ध व्यावसायिकांना या रेल्वे फाटकाचा नाहक त्रास होतो. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत. वडगाव हे इतर सर्व रेल्वे स्थानकाप्रमाणे नेहमी गजबजलेले असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये, महाविद्यालय, दवाखाने, न्यायालय असल्यामुळे या स्थानकावर प्रवाशांची वर्दळ असते. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. वडगाव स्थानकाची प्रमुख समस्या म्हणजे या स्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महिला रेल्वे कर्मचारीसाठी असणारे स्वच्छतागृह वापरात आहे. परंतु ते देखील ठरावीकच महिलांना माहिती असल्यामुळे इतर महिलांची या स्थानकावर कुचंबणा होते . आता नव्याने स्वच्छतागृह रेल्वेकडून बांधण्यास सुरुवात झाली असून, ते कामदेखील अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे स्थानकावर त्वरित स्वच्छतागृह बांधण्याची मागणी महिलांकडून होत आहे. स्थानकासाठी पार्किंग सुविधेचा अभाव जाणवतो. स्थानकाच्या बाहेर पार्किंग करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध आहे. परंतु या ठिकाणी पार्किंग देखभाल करण्यासाठी कर्मचारी किंवा कोणी खासगी व्यक्ती नसल्यामुळे प्रवासी कशीही वाहने लावून जातात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूककोंडी होताना दिसते. प्रवासी घाईघाईत वाहने प्रवेशद्वारासमोरच लावत असल्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे. मोफत पार्किंगमुळे न्यायालय, शासकीय कार्यालयात येणारे वाहने सर्रास येथे लावून जातात. अनेकदा ते वेळेत परत येत नाहीत. रेल्वे प्रवाशांच्या वाहनांसामोरच नागरिक वाहन लावून गेल्यामुळे अनेकदा प्रवासी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची होते.
पादचारी पूल वापराअभावी निरुपयोगी
By admin | Published: January 24, 2017 1:57 AM