- प्रकाश गायकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येतो. सद्यस्थितीत शहरातील बाधितांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. मध्यंतरी कोरोनाच्या बाधितांची संख्या कमी झाली होती. तीव्रता कमी झाल्याने नागरिकांनीही लसीच्या बूस्टर डोसकडे पाठ फिरवली होती. मात्र, सध्या कोरोनाच्या बाधितांची संख्या वाढत असताना लसीचा साठा संपल्याने लसीकरण देखील ठप्प झाले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. नागरिकांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. शहरात अद्यापपर्यंत केवळ दोन लाख ३८ हजार ५२३ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. सध्या बाधितांची संख्या वाढत असल्याने केंद्र व राज्य सरकार अलर्ट झाले आहे. शासन स्तरावरून नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ केंद्रावर लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, लसींचा साठा संपल्याने लसीकरण मोहिम ठप्प झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आता बाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तसेच रुग्णालयामध्ये अवघ्या पाच रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. बाधितांना घरीच गृहविलगीकरणामध्ये राहण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यांच्यामध्ये सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे आहेत. मात्र ती सौम्य असल्याने अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये रुग्ण ठणठणीत बरे होत असल्याचे वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्यंतरी बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरवली होती. लसीचा साठा संपला आहे. त्यासाठी मागणी केली आहे. साठा उपलब्ध झाल्यावर त्वरित लसीकरण सुरू केले जाईल. आता दिवसभरामध्ये सरासरी २५ ते ३० बाधित आढळत आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आहेत. १७० बाधितांपैकी अवघे ५ रुग्ण रुग्णालयामध्ये आहेत. त्यांचीही प्रकृती चांगली असून लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. - डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी.