- प्रकाश गायकर
पिंपरी : प्रेमाला जात, धर्माचे बंधन नसते. आयुष्यामध्ये प्रत्येकाला जीवनसाथीची आवश्यकता असते. आयुष्याच्या प्रत्येक सुख - दु:खात पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी अशा प्रेमळ व्यक्तीची गरज असते. त्यासाठी अनेकजण जाती - धर्मांच्या भिंती ओलांडतात. अशाच पद्धतीने पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणीने धर्माची भिंत ओलांडून गावाकडील तरुणाशी लग्नगाठ बांधली. त्यानेही प्रेमाला साद घालत या दिव्यांग तरुणीशी संसार थाटला.
पिंपरी - चिंचवड शहरामध्ये आम्रपाली गायकवाड वृत्तपत्रामध्ये काम करतात. दिव्यांग असूनही नोकरी करून त्या भक्कमपणे स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. २०१७मध्ये त्यांच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. मात्र, दिव्यांग असल्याने नकार येत होता. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील विठ्ठल एकनाथ बडगुजर या शेती करणाऱ्या तरुणासाठीही त्याच्या घरच्यांनी वधू शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र, शिक्षण कमी आणि शेती करत असल्याने त्यांनाही अनेक स्थळांकडून नकार येत होता. दोन्ही कुटुंबांची शोधमोहीम सुरू असताना त्यांना एकमेकांविषयी माहिती झाली. मात्र, धर्म वेगळा असल्याची मोठी भिंत त्यांच्यामध्ये होती.
आम्रपाली आणि विठ्ठल या दोघांनीही ही भिंत तोडायचे ठरवले. शिक्षण कमी असले तरी माणूस म्हणून विठ्ठल चांगला असल्याचे आम्रपाली यांनी हेरले, तर विठ्ठल यांनीही मुलगी कष्टाळू असून, दोघांचा सुखाचा संसार होईल, हे जाणले होते. त्यामुळेच दोघांनीही लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. २०१७मध्ये ते विवाहबंधनात अडकले.
राजा-राणीचा संसार
आम्रपाली पेज डिझायनिंगचे काम करतात, तर विठ्ठल यांनी पुणे - मुंबई महामार्गालगत इम्पायर एस्टेट पुलाजवळ चहाची टपरी सुरू केली आहे. दोघेही कष्ट करत राजा-राणीच्या संसारात रमले आहेत.
प्रेमाच्या वेलीवर उमलली कळी
दोघांच्या सुखी संसाराला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रेमाच्या वेलीवर सुंदर कळी उमलली असून, त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. जाती - धर्माचे बांध तोडून एकत्र आलेले दोघेही संसारात सुखी आहेत.
प्रत्येकाच्या आयुष्यात जीवनसाथीची गरज असते. प्रत्येक टप्प्यावर प्रेम करणारा हक्काचा माणूस असला की, आयुष्यात सर्व काही असल्याची जाणीव होते. आम्ही दोघांनीही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आज संसारात सुखी आहोत.
- आम्रपाली गायकवाड.