पिंपरी : शैक्षणिक क्षेत्रात शंकरलाल मुथा यांनी मोठे काम केले त्यांचा पुतळा आज उभारला आहे. श्री जैन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेला ९७ वर्ष पूर्ण झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे काम या संस्थेने केले. शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणूक करायची म्हणून नव्हे तर सामाजिक कार्य म्हणून या संस्थेची स्थापना झाली. शिक्षण क्षेत्रात जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.
शिक्षणमहर्षी दिवंगत शंकरलाल जोगीदास मुथा यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण खासदार शरद पवार यांच्या हस्ते चिंचवड येथील रसिकलाल एम. धारिवाल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात शनिवारी (दि. २१) झाले. यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशचंद धारिवाल व पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, संस्था चालवत असताना अनेक संकटे येतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणसंस्था उभारत महाराष्ट्रात शिक्षणाची मूहर्तमेढ रोवली. एकेकाळी त्यांच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना जेवणाची पंचाईत झाली होती. ही बातमी भाऊरावांच्या पत्नीच्या कानावर गेली. त्यांनी त्यांच्या गळ्यातले मंगळसूत्र काढून ते विका पण माझी पोर उपाशी राहता कामा नये असे सांगितले. एवढी त्यागाची भावना असल्याने आज त्या संस्थेतून अनेक विद्यार्थी घडले. अशाच अडचणी शंकरलाल मुथा यांनाही आल्या, मात्र त्यांनी न डगमगता आपली संस्था वाढवली. आज या संस्थेत १५ हजार मुले शिक्षण घेत आहेत ही आनंदाची बाब आहे. येथील मुलांमध्ये शिक्षणासोबतच आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम या शैक्षणिक संस्थांनी केले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
मदतीसाठी पिंपरी चिंचवड तत्पर-
किल्लारीला भूंकप झाला होता त्यावेळी अनेक मुले निराधार झाली होती. मी त्या मुलांना घेऊन पिंपरी चिंचवडला आणले. त्यांच्यासाठी भारतीय जैन संघामध्ये राहण्याची व्यवस्था केली. आज ती मुले डॉक्टर, इंजिनियर, सरकारी अधिकारी झाली आहेत. त्यावेळी एका शब्दावर पिंपरी चिंचवड मदतीला धावले. मुख्यमंत्री असताना नैसर्गिक आपत्ती, बॉम्बस्फोट या आपत्ती हातळल्या. त्यानंतर चार - पाच वर्ष प्रशासनामध्ये लक्ष घालून यंत्रणा सज्ज केल्या. त्यामुळे आज कोणतीही आपत्ती आली तर राज्यातील यंत्रणा सज्ज असल्याचे पवार म्हणाले.