लोणावळा : लोणावळा शहरातील मानाची पहिली हंडी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वलवण गोविंदा पथकाने सहा थर रचत फोडली. लोणावळा शहरातील या दहीहंडी महोत्सवात यंदा मुंबई येथिल 38 व लोणावळा शहर परिसरातील 12 संघांनी सहभाग घेतला होता. यावर्षी दहीहंडी सोबत प्रथमच पारंपारिक खेळाला चालना मिळावी याकरिता ढोल लेझिम खेळाच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाच पथकांनी सहभाग नोंदविला होता. दहीहंडी फोडण्याकरिता फायनल राऊंडमध्ये नऊ संघ होते. यापैकी चवथ्या क्रमांकावर असलेल्या वलवण पथकाने सहा थर लावत हंडी फोडली. मावळ वार्ता फाऊंडेशन, लोणावळा शहर पत्रकार संघ, राजकिय पक्ष व विविध संघटना यांच्या संयुक्तरित्या शहरात गत तेरा वर्षापासून या मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात येते. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष नविन भुरट, महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र चौहान, स्वामी समर्थ प्रमोटर्सचे किरण गायकवाड, रमेश पाळेकर, प्रमोद गायकवाड यांच्यासह विविध मन्यवरांच्या हस्ते हंडीचे पुजन करत दहीहंडी सोहळ्याला दुपारी सुरुवात करण्यात आली. शहरातील या हंडीला सलामी देण्याकरिता मुंबई, ठाणे, कल्याण, डोबिंवली भागातील 38 संघ आले होते. त्यासह स्थानिक 12 संघांनी या सोहळ्यात रंगत आणली.
ढोलताशे पथकांचे सादरीकरण पाहण्याकरिता नागरिकांनी चौकात मोठी गर्दी केली होती. अतिशय शिस्तबध्दपणे व शांततेमध्ये हा सोहळा पार पडला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे, तळेगावचे मा.उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांनी सोहळ्याला भेट देत गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री टिना गोविंदा आहुजा हिने देखिल लोणावळ्यात येथे गोविंदाना शुभेच्छा दिल्या.