पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने (BJP) पाच वर्षांत नुसता भ्रष्टाचारच केला. त्यामुळे महापालिकेतील (Pimpri Chinchwad municipal corporation) पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्यांची गरिमा मलीन झाली, असा आरोप करून वंचित बहुजन आघाडीतर्फे (vanchit bahujan aaghadi) यज्ञ करून महापालिकेतील खुर्च्यांचे इंद्रायणी व पवना नदीच्या पाण्याने शुद्धीकरण केले.
आघाडीतर्फे गुरुवारी (दि. २४) पिंपरी येथे महापालिका भवनाच्या मुख्य प्रवेशव्दारावर आंदोलन करून यज्ञ करण्यात आला. आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, शहर प्रवक्ता राजन नायर, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा लता रोकडे, युवा आघाडीचे शहराध्यक्ष चंद्रकांत लोंढे आदी या वेळी उपस्थित होते.
देवेंद्र तायडे म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेत सत्ताधारी भाजपाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांचे लाचखोरी प्रकरण, ठेकेदारांच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात वस्तूंच्या खरेदीमधील गैरव्यवहार, ठेकेदारामार्फत कंत्राटी कामगार व सफाई कर्मचारी यांचे आर्थिक शोषण तसेच ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली करदात्या जनतेच्या पैशांची लूट सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. महापालिकेच्या सर्वच विभागांमध्ये सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. ‘तेरी भी चुप और मेरी भी चुप’ अशी भूमिका महापालिकेतील विरोधी पक्षाने घेतल्याचे दिसून आले.
राजन नायर म्हणाले, पाच वर्षांच्या कार्यकाळात जबाबदार पदांवर असलेल्या नगरसेवकांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि पक्षनेते व विरोधी पक्षनेते यांच्या खुर्च्यांची गरिमा मलीन झाली. सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी असलेले महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व पक्षनेत्यांनी कामकाज पाहिले त्या खूर्च्यांच्या शुद्धीकरणासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे हा यज्ञ केला.