पिंपरी : मृतदेहाची अदलाबदली झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर गोंधळ होऊन रुग्णालयात तोडफोड करण्यात आली. पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी (दि. १९) दुपारी हा प्रकार घडला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दापोडी येथे भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, थेरगाव परिसरातील एका मृत महिलेचे देखील शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते.
बुधवारी सकाळी थेरगाव येथील मृत महिलेच्या नातेवाईकांनी शओविच्छेदनगृहातून मृतदेह नेला. मात्र तो मृतदेह दापोडी येथील मृत महिलेचा होता. त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान दापोडी येथील मृत महिलेचे नातेवाईक मृतदेह घेऊन जाण्यासाठी शवविच्छेदनगृहात आले. त्यावेळी त्यांना थेरगाव येथील मृत महिलेचा विच्छेदन केलेला मृतदेह देण्यात आला. मात्र संबंधित मयत व्यक्ती आपले नातेवाईक नसल्याचे दापोडी येथील नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यामुळे मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे उघडकीस आले.
दापोडी येथील महिलेचा मृतदेह थेरगाव येथे नेण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे दापोडी येथील महिलेच्या नातेवाईकांना समजले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर वायसीएम रुग्णालयात गोंधळ होऊन तोडफोड झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.