पिंपरी : काही वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असले तरी शहरातील वाहन चोरीचे सत्र थांबलेले नाही. चारचाकी वाहने चोरून नेण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे वाहन धारक धास्तावले आहेत. चोरट्यांनी तीन दुचाकीसह एक चारचाकी, अशी चार वाहने चोरून नेल्याप्रकरणी सोमवारी (दि. ८) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमोल प्रभाकर जाधव (वय, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांचे चार लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन त्यांच्या सोसायटीच्या समोर सार्वजनिक रस्त्याच्या कडेला पार्क केले होते. अज्ञात चोरट्यांनी चारचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार रविवारी (दि. ७) सायंकाळी सव्वासहा ते सोमवारी (दि. ८) सकाळी आठच्या दरम्यान घडला.
शंकर सावित्रा गाडेकर (वय ३८, रा. चाकण, मूळ रा. पिपळगाव, ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी झित्राईमळा मंदिराच्या पाठीमागील बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार शनिवारी (दि. ६) रात्री नऊ ते रविवारी (दि.७) सकाळी आठच्या दरम्यान घडला.
बापू शंकरराव गोमे (वय ४४, रा. साईनगर, मामुर्डी, देहूरोड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नेत्यांची पंचवीस हजार रुपये किमतीची दुचाकी प्राधिकरण निगडी येथे एका हॉस्पिटलच्या पाठीमागील बंगल्यासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घडला.
प्रशांत शंकर राजगुरू (वय २७, रा. वराळे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या मोकळ्या जागेत पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार रविवारी (दि. ७) रात्री १० ते सोमवारी (दि. ८) सकाळी सातच्या दरम्यान घडला.