नारायण बडगुजर-
पिंपरी : वाहनचोरट्यांच्या आंतरजिल्हा तसेच आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. मात्र तरीही वाहनचोरीचे प्रकार कमी झालेले नाहीत. शहरात तीन वर्षांत तीन हजार ६९७ वाहनांची चोरी झाली. यात दुचाकी चाेरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे.
वाहन पेटविण्याच्या तसेच तोडफोडीच्या घटनांमुळे शहरात भितीचे वातावरण होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाल्यानंतर त्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या. तत्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शीघ्र कृती पथक (क्यूआरटी) नियुक्त केले. त्यामुळे वाहन तोडफोडीच्या तसेच वाहन पेटविण्याच्या घटना नियंत्रणात आल्या. मात्र त्यानंतर वाहनचोरीचे प्रकार वाढले. त्यामुळे वाहन चोरी प्रतिबंधक पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाकडून वाहनचोरट्यांच्या टोळ्यांचा तसेच आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. मात्र कोरोना महामारीमुळे सर्व पथके बरखास्त करण्यात आली. लाॅकडाऊनची अंमलबजावणीला प्राधान्य देण्यात आले. लाॅकडाऊन काळात वाहनचोरीचे प्रकार कमी झाले. मात्र लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर चोरट्यांनी पुन्हा वाहनचोरीचे उद्योग सुरू केले. घराच्या पार्किंगमधून, भर रस्त्यातून वाहने चोरीला जात आहेत. तसेच महागड्या सायकल चोरीचे प्रकारही समोर येत आहेत.
कंटेनर, जेसीबीसह अवजड वाहनेही पळविलीकोरोना काळात चोरट्यांनी ट्रक, कंटेनर, जेसीबी, यासह टेम्पो आदी अवजड वाहने चोरून नेली. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले असल्याचे दिसून येते. चोरी झाल्यानंतर ही वाहने नेमकी कुठे नेली जातात, त्यांची विल्हेवाट कशी लावली जाते किंवा त्यांची विक्री कशा पद्धतीने होते, याबाबत शोध घेणे आवश्यक आहे.
दुचाकींची चोरी सर्वाधिकवाहनचोरीत दुचाकी पळविण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहनचालक त्यांची दुचाकी कोठेही पार्क करतात. तसेच चावी नसतानाही दुचाकी सुरू करणे सहज शक्य असते. त्यामुळे चोरट्यांना कमी वेळेत, कमी श्रमांमध्ये दुचाकी चोरी करणे शक्य होते. त्याला खरेदीदार देखील उपलब्ध होतो.
वाहनचोरीचे दाखल गुन्हे २०१८ २०१९ २०२०दुचाकी १२६८ ११४४ ८६१तीनचाकी २९ २८ २१चारचाकी १३६ ११८ ९२एकूण १४३३ १२९० ९७४
पोलिसांकडून शोध घेण्यात आलेली वाहने २०१८ २०१९ २०२०दुचाकी २७६ २३५ १७८तीनचाकी १२ १३ ८चारचाकी ४६ ३१ २५एकूण ३३४ २७९ २११
सायकल चोरी २०१८ २०१९ २०२०दाखल गुन्हे ११ ४२ ८उघड गुन्हे ६ १० ८