पिंपरी :शहरात वाहन चोरीचे प्रकार सर्रास घडत आहेत. वाहन चोरटे सुसाट असल्याचे त्यावरून दिसून येते. चोरट्यांनी दोन दुचाकी व दोन रिक्षा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी (दि. ३०) निगडी व हिंजवडी पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत विक्रम शेषेराव वनवे (वय ४५, रा. दुर्गा नगर झोपडपट्टी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनवे यांनी त्यांची दुचाकी दुर्गा नगर झोपडपट्टी येथे शनिवारी लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.
दुसऱ्या घटनेत साकिर अजिज शेख (वय ३३, रा. राहुल नगर, ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांनी त्यांची रिक्षा घराजवळील रस्त्यावर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती रिक्षा चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार २२ मे रोजी रात्री ११ ते २३ मे रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडला.
तिसऱ्या घटनेत भानुदास रामचंद्र कलाटे (वय ५१, रा. कस्तुरी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कलाटे यांनी त्यांची दुचाकी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घरा समोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.
चौथ्या घटनेत इमानदार रामा लोमटे (वय ३६, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुणाल सुरेश जगताप (रा. पिंपळे निलख), प्रदीप कांबळे (रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोमटे यांनी त्यांची तीस हजार रुपये किंमतीची आटो रिक्षा घराच्या समोर लॉक करून पार्क केली होती. चोरट्यांनी ती रिक्षा चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला.