पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये मंगळवारी दुपारी दोनच्या दरम्यान वरिष्ठ लिपिक आणि दापोडी शाळेतील शिक्षिकांची शाब्दिक बाचाबाची झाली. जोरजोरात आवाजामुळे नळावरील भांडणाप्रमाणे वातावरण झाले होते. यावरून शिक्षण विभागातील शिस्त आणि कामकाजाबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली.
शिक्षण विभाग सातत्याने कुठल्या न कुठल्या कारणावरून चर्चेत असतो. मात्र, मंगळवारी दुपारी चक्क नळावरील भांडण सुरू असल्याचा जोरजोरात आवाज सुरू असल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यावेळी दोन लिपिक आणि दापोडी शाळेतील दोन शिक्षिका जोरजोरात भांडत असल्याचे निदर्शनास आले. कारण असे होते की, महापालिकेची दुपारच्या जेवणाची वेळ दीड ते दोन आहे. मात्र, दोन वाजून पाच मिनिटांनी महिला लिपिक जेवण करत असून, त्या शिक्षिकांच्या कामाकडे जाणूनबूजुन दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये जुंपली होती.
अशा प्रकारामुळे शिक्षण विभागातील शिस्त कामकाजाची चुकीची पद्धत यावरून सर्वत्र चर्चा सुरू होते. याबाबत शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांना विचारणा केली असता, आपण कामानिमित्त बाहेर असल्याने आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.