पिंपरी : वाढीव व्याजदराने दिलेले कर्ज परतफेड न केल्यास सावकार कर्जदार व्यावसायिकाचा जीव घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत, अशा घटना शहरात घडल्या असून, खासगी सावकारांचा खून प्रकरणात हात असल्याचे उघडकीस आले आहे. खासगी सावकारीचे कर्ज जिवावर बेतणारे असल्याचा मुद्दा निगडीतील खून प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. व्यवसायाला खेळते भांडवल म्हणून व्यापारी, व्यावसायिकांना नेहमीच पैशांची गरज भासते. अशा वेळी बँकेची वेळखाऊ कर्जप्रक्रिया टाळून खासगी सावकाराकडून तातडीने कर्ज घेण्याचा मार्ग ते पत्करतात. परंतु खासगी सावकारांचे कर्ज त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू लागले आहे. निगडी उड्डाणपुलावर शंकर झेंडे या हॉटेल व्यावसायिकाचा खून झाला. या खून प्रकरणात ज्या सावकाराने झेंडे यांना व्याजाने पैसे दिले होते. त्या सावकाराचा खून प्रकरणात सहभाग असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. हे अलीकडचे ताजे उदाहरण आहे. आठ महिन्यांपूर्वी चिखली, कुदळवाडीत एका तरुणाला कर्जाची परतफेड केली नाही,म्हणून सावकाराने ठार मारले. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरून टाकला. हे प्रकरण चव्हाट्यावर आले. कर्जाचे पैसे परत मिळाले नाहीत म्हणून सावकाराने तरुणाचा खून केल्याचे पोलीस तपासातनिष्पन्न झाले होते. असाच प्रकार भोसरीत एका उद्योजकाच्या बाबतीत घडला होता. व्याजाने पैसे देण्याचा रितसर परवाना न घेता अनेकजण सावकारी धंदा करतात. बेकायदा सावकारी करीत असल्याने या व्यवहाराचे कायदेशीर करारनामे केले जात नाहीत.मनमानी पद्धतीने व्याजदराची आकारणीदिलेल्या रकमेची सुरक्षितता अशी सबब पुढे करून सावकार संबंधित कर्जदारांकडून कोरे धनादेश आपल्याकडे ठेवून घेतात. या धनादेशांचा ते त्यांच्या मर्जीनुसार उपयोग करून घेतात. दरसाल दरशेकडा अशा स्वरूपात बँकांचे वार्षिक व्याजदर असतात. खासगी सावकारांचे मात्र मनमानी चक्रवाढव्याज पद्धतीचे व्याज दर असल्याने कितीही रकमेची परतफेड केली, तरी कर्ज पूर्णपणे फिटत नाही. व्याजाची रक्कम त्यांच्याकडून वेळोवेळी वसूल केली जाते. मुद्दल तशीच असते.
खासगी सावकारीमुळे व्यावसायिकांचे बळी , वाढीव व्याजाचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:30 AM