पिंपरी : घर बसल्या काम मिळेल फक्त पाठवलेल्या लिंकवरील व्हिडीओला लाईक करायचे, तसेच ठराविक रक्कम गुंतवली तर दुप्पट रक्कम त्याच दिवशी परत मिळणार, असे अमिष दाखवून तरुणाचे आठ लाख ९६ हजार ४०० रुपये वेळोवेळी घेऊन फसवणूक केली. ही घटना बुधवारी (दि.१२) ते गुरुवार (दि.२०) या कालावधीत घडली. या प्रकरणी विभोर विनय शुक्ला (वय ३३ रा. थेरगाव) यांनी रविवारी (दि.२३) वाकड पोलीस ठाण्यात फ्री लान्सर कंपनीत काम करणारी महिला लतीशा, फराह, मेसेज करणारी अलीना नावाची महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनओळखी नंबरवरून व्हॉट्सपवर मेसेज आला. व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील तसेच ठराविक रक्कम पाठविल्यास त्याच दिवशी जास्तीचे पैसे मिळतील, असे अमिष या मेसेजमधून दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. लिंक पाठवून फिर्यादीला टास्क पूर्ण करण्यास सांगून त्याप्रमाण पैसे गुंतविण्यास भाग पाडले. तसेच टेलिग्रामवर एक ग्रुप जॉईन करण्यास सांगून तब्बल आठ लाख ९६ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले. फिर्यादी यांना पैसे पाठवले मात्र, हे पैसे परत न आरोपींनी पैशाचा अपहार करत आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.