Vidhan Sabha 2019 : पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमानांविरोधात आघाडी कोणाला उतरविणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:38 PM2019-10-02T13:38:12+5:302019-10-02T13:42:52+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात तीन आणि मावळात एक असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत....
पिंपरी : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा आणि शिवसेनेने पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदार संघातील उमेदवार जाहीर केले असून, भाजपाने विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आमदारांविरोधातकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी कोणाला उतरविणार? याबाबत राजकीय वतुर्ळात चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात तीन आणि मावळात एक असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजूनही प्रमुख पक्षांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. भाजपा-शिवसेना महायुतीचा निर्णय झाल्यानंतर भाजपाच्या पहिल्या यादीत चिंचवडमधून शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीतून अपक्ष आमदार महेश लांडगे, पिंपरीतून शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, मावळमधून भाजपा उमेदवार जाहीर झाला नाही. पहिल्या यादीत राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे नाव नाही. त्यामुळे भेगडे समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे.
आघाडीकडून मोचेर्बांधणी सुरू
शहरातील तिन्ही मतदारसंघात महायुतीच्या वतीने विद्यमान आमदारांना संधी दिल्याने यांच्याविरोधात दमदार उमेदवार उतरविण्याची तयारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने केली आहे. विरोधीपक्षांचे मोट बांधण्याचे काम सुरू झाले आहे. नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. आघाडीच्या यादीत कोणाची वर्णी लागणार यावर विधानसभेतील लढत निश्चित होणार आहे.
भाजपा-शिवसेनेत जल्लोष
उमेदवारी जाहीर झाल्याने आमदार जगताप, लांडगे, आणि चाबुकस्वार यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. चिंचवडला पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे, मामुर्डी या भागात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. लांडगे यांच्या वतीने भोसरी परिसरात कार्यक्रम झाला. तर शिवसेनेच्या वतीने आकुडीर्तील कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांनी बैठक घेतली. आमदार जगताप गुरुवारी अर्ज दाखल करणार असून, आमदार लांडगे शुक्रवारी तर आमदार चाबुकस्वार हे गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मावळचा तिढा सुटेना
मावळमध्ये बाळा भेगडे हे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री आहेत. पहिल्या यादीत भेगडे यांचे नाव नसल्याने समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे. पहिल्या यादीत नाव का नाही? याबाबत तर्क आणि विर्तक लढविले जात आहेत. मावळमध्ये अद्यापपर्यंतचा इतिहास पाहता प्रत्येकाला एकदाच संधी मिळाली आहे. त्यामुळे यादीत नाव नसल्याने भेगडे समर्थकांची धाकधूक वाढली आहे.
बंडखोरी रोखण्याचे आव्हान
युती आणि आघाडी फिस्कटण्याची वाट अनेक इच्छुक पाहत होते़ मात्र, युती आणि आघाडी झाली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरले आहे. पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारांची संख्या अधिक होती. गेल्या दोन महिन्यांपासून पोस्टरबाजी सुरू होती. इच्छुकांच्या आकांक्षावर पाणी पडले आहे. पिंपरी आणि भोसरीतील इच्छुक कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले असून, बंडखोरी रोखण्याचे आव्हान प्रमुख पक्षांसमोर आले. चिंचवड आणि मावळमधील इच्छुकांची नाराजी दूर करावी लागणार आहे.