पिंपरी : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाजपा सलगीच्या सोशल मिडीयावरील चर्चांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूरवर दावा ठोकला आहे. लांडे यांनी दंड थोपटल्याने शिरूरसाठी कोल्हे की लांडे यांच्यापैकी कोणास संधी मिळणार याबाबत राजकीय वतुर्ळात चर्चा रंगली आहे. तर ‘‘पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ अशा शब्दांत डॉ. कोल्हें यांनी चर्चा फेटाळून लावली आहे. लोकसभा निवडणूका वर्षावर आल्या आहेत. त्यामुळे राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या वर्षभरापासून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शिवप्रताप गरूडझेप आणि शंभूराजे महानाट्याच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसून येत नाहीत. तसेच चिंचवड विधानसभा आणि पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात ते दिसले नाहीत. त्यामुळे कोल्हे यांची भाजपा सलगी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. तर कोल्हे लोकसभा निवडणूक लढणार की नाहीत? याबाबतही सोशल मिडीयावर चर्चा रंगत आहे. त्यानंतर माजी आमदार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ‘संधी दिली तर निवडणूक लढविणार आणि निवडूण येणार? असे सूचक विधान केले आहे. तर त्यास सोशल मिडीयावरून खासदार कोल्हे यांनी उत्तर दिले आहे. ‘शिवप्रताप गरूडझेप चित्रपटाच्या निमित्ताने झालेली भेटीस राजकीय रंग दिला. ते योग्य नाही, असे सांगून भाजपा सलगीच्या चर्चा फेटाळून लावत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
२०१९ प्रमाणे लांडे अॅक्टीव्ह
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी सहा महिने लांडे यांनी सहा विधानसभा मतदार संघात दौरे करून तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यावर तसेच मतदार संघातील अपूर्ण प्रश्नांवर फ्लेक्सबाजीतून प्रश्न केले होते. मात्र, ऐनवेळी रिंगणात अभिनेते कोल्हे यांची एन्ट्री झाल्याने लांडे यांचा पत्ता कट झाला होता. आता पुन्हा लांडे रिंगणात येणार असल्याचे दिसून येत आहे.
संधी दिली तर निवडणूक लढणार आणि जिंकून येणार
२००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. पडत्या काळात आम्ही पक्षाबरोबर होतो. २०१९ पूर्वी मी सहा महिने मतदार संघात फिरलो. तत्कालीन खासदारांचा तीन टर्ममधील लेखाजोखा मांडला होता. मात्र, ऐनवेळी सेलीब्रेटी आले. आणि मला संधी मिळाली नाही. आता संधी दिली तर निवडणूक लढणार आणि जिंकून येणार?. -विलास लांडे, माजी आमदार
पवार साहेब सांगतील ते धोरण
शिरूरच्या उमेदवारीविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मला २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संधी दिली. त्यानंतर चार वर्षे मी येथील प्रश्नांसाठी प्रयत्नशील आहे. त्यात पुणे नाशिक महामार्ग आणि बैलगाडा प्रश्न, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रश्न कॅबीनेट अप्रुव्हल साठी तीस हजार कोटीची कामे सुरू होत आहे. वढू येथील छत्रपती संभाजीमहाराज समाधी परिसरासाठी निधी मंजूर झाला आहे. माझ्या सारख्या राजकीय पार्श्वभूमी नाही आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरूणांस संधी दिली. मी काही दावा करणे तर्कसंगत नाही. पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. -डॉ अमोल कोल्हे, खासदार