लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : रक्तदान आणि नेत्रदानाचे मूल्य मोठे आहे. त्यामुळेच ‘जीवनभर रक्तदान, मृत्यूनंतर नेत्रदान’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या भोसरीतील जागृती सोशल फाउंडेशनच्या प्रयत्नातून आतापर्यंत ७२ जणांना दृष्टी देण्याचे बहुमोल काम केले आहे. संस्थेने ४२ जणांच्या यशस्वी नेत्रदानातून हे काम केले आहे. त्यामुळे जागृती सोशल फाउंडेशनच्या अथक प्रयत्नांना यश मिळत असून, समाजात नेत्रदान करण्यासंबंधी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असल्याचे दिसून येते. चिंचवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर नायडू यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात जागृती सोशल फाउंडेशन चे हेमंत गावंडे यांनी नायडू कुटुंबीयांशी संपर्क साधून नेत्रदानासंबंधी त्यांना माहिती दिली व आवाहन केले. त्यानुसार नायडू कुटुंबीयांनी या सामाजिक कार्यास संमती दर्शवत नेत्रदान व देहदान करण्याचा निर्णय घेतला. कागदोपत्री सर्व सोपस्कार पार पाडून कै. नायडू यांचे नेत्रदान पार पडले. त्यानंतर तळेगाव वैद्यकीय महाविद्यालयात नायडू यांचे संपूर्ण देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. मृत व्यक्तीच्या नेत्रदानाचा प्रस्ताव अनेकदा त्याच्या कुटुंबीयांद्वारे धुडकावून लावला जातो. मात्र, दृष्टिहीन व्यक्तींची गरज ओळखून जागृती सोशल फाउंडेशनने नेत्रदानाबाबत जनजागृतीचे काम १७ आॅगस्ट २०१० पासून सुरू केले. भोसरीतील राम फुगे, अविनाश फुगे, विश्वास काशीद, स्वप्नील फुगे, नीलेश धावडे, डॉ. अनिल काळे, अक्षय तापकीर, दिनेश लांडगे, विकास ढगे, सौरभ घारे, राहुल खाचणे, संतोष नवलखा, अविनाश मोहिते, प्रमोद झेंडे, सुनील कडूसकर, लॉरेन्स झेवियर्स यांनी एकत्र येऊन जागृती सोशल फाउंडेशनची स्थापना केली. नेत्रदानाविषयी आणखी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज असल्याचे मत राम फुगे यांनी व्यक्त केले. आतापर्यंत फाउंडेशनने दहा हजार कुटुंबीयांचे नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले आहेत. नेत्रदानाचा प्रसार होण्यासाठी सरकार आणि महापालिकेने पुढाकार घ्यावा. आतापर्यंत ज्या कुटुंबीयांमधील सदस्यांनी नेत्रदान केले आहे, त्या कुटुंबीयांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा, अशी संकल्पना फुगे यांनी मांडली आहे. जागृती सोशल फाउंडेशनद्वारे २०१६-१७ या वर्षामध्ये शांतिलाल कटारिया, बसंतीबाई चोरडिया, पन्नालालजी गुगळे, पांडुरंग जाधव, शंकर शेंडे, रत्नप्रभा लाकाळ, मधुकर नायडू आदींनी नेत्रदान केले आहे.
नेत्रदानातून ७२ जणांना दृष्टी
By admin | Published: May 12, 2017 5:02 AM