लोणावळा - येथील प्रसिद्ध एकवीरा देवी मंदिराचा कळस सहा महिन्यांपूर्वी चोरीला गेला आहे. सदर कळस चोरीस गेल्यानंतर नव्याने कळस बसविण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी देवस्थान ट्रस्टला पत्र पाठवून विनंती केली होती़ मंदिर समितीने ती मान्य केल्यानंतर बारणे यांनी ट्रस्टसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत त्याबाबत घोषणा केली होती़ त्यानुसार मंगळवारी प्रताप श्रीरंग बारणे यांच्या हस्ते कळस देवस्थानला भेट देण्यात आला.चिंचवड येथील सोनिगरा ज्वेलर्सचे मालक दिलीप सोनिगरा यांच्याकडून नव्याने हा कळस तयार करून घेण्यात आला आहे. प्रताप बारणे यांच्यासोबत या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, उपतालुकाप्रमुख सुरेश गायकवाड, ओबीसी संघटना मावळ अध्यक्ष अंकुश देशमुख, माऊली घोगरे, नगरसेवक शिवदास पिल्ले, अशोक म्हाळसकर, विनायक हुलावळे, दत्तात्रय केदारी, प्रशांत शेडगे हे उपस्थित होते. श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टकडे कळस सुपूर्द करत असल्याची कल्पना आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत तरे यांना दिल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.कळसचोरीनंतर देवस्थान ट्रस्टमध्ये झालेले वाद व काही विश्वस्तांनी ग्रामस्थांना हाताशी धरत तयार केलेला समांतर ट्रस्ट या वादामुळेआजपर्यंत मंदिरावर सदर कळस बसविण्यात आला नव्हता. दोन दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांकडून देवस्थान ट्रस्टच्या बाजूने निकाल लागल्यानंतर, खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा मंदिर समितीकडे कळस बसविण्याबाबत विनंती केली़ त्यानुसार बारणे यांचे चिरंजीव प्रताप बारणे यांनी एकवीरा देवी गडावर जाऊन कळस ट्रस्टकडे सुपूर्द केला. लोकसभेचे अधिवेशन असल्याने खासदार श्रीरंग बारणे दिल्लीमध्ये असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.
कार्ला येथील एकवीरा देवस्थानला कळस भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 3:10 AM