भेट पवार साहेब-दादांची! पिंपरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व; दोघांनी एकत्र काम करावे, कार्यकर्त्यांची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:22 PM2023-08-17T12:22:43+5:302023-08-17T12:25:20+5:30

पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांना शरद पवारांनी बळ दिले तर अजित पवारांनी त्यांना मोठे करण्याचे काम केले

Visit sharad Pawar and ajit pawar ncp dominance in Pimpri chinchwad Both should work together activists want | भेट पवार साहेब-दादांची! पिंपरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व; दोघांनी एकत्र काम करावे, कार्यकर्त्यांची इच्छा

भेट पवार साहेब-दादांची! पिंपरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व; दोघांनी एकत्र काम करावे, कार्यकर्त्यांची इच्छा

googlenewsNext

पिंपरी : अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या एकूण चार भेटी घेतल्या आहेत. नुकतीच पुण्यात झालेली बहुचर्चित गुप्त बैठक सोडली तरी त्याआधीदेखील वेगवेगळी कारणे देऊन अजित पवारांनीशरद पवारांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी, भाजप नेत्यांनी लोकमतला प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

पिंपरी चिंचवडवर विशेष प्रेम असलेल्या अजित पवार यांचे आता महापालिकेच्या राजकारणातही वर्चस्व राहणार, हे उघड सत्य आहे. शहरात भाजपची सत्ता नव्हती, तेव्हापासून काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार लक्ष्मण जगताप तर २०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शहरात दोन्ही आमदारांच्या काळात नाराजी होतीच. ती सहन करत आज ना उद्या काही तरी मिळेल, या अपेक्षेने निष्ठावंत कार्यकर्ते पक्षात काम करत होते. परंतु; आता भाजपच्या सत्तेच्या वाट्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटाच्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची भर पडणार आहे. पवार गटही आता महापालिकेच्या नगरसेवकांच्या उमेदवारीत निम्मा वाटा मागणार, अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतासह शहराध्यक्ष, आमदार लांडगे व आमदार जगताप यांच्या गटातही नाराजी पसरली आहे.

 कार्यकर्ते ‘वेट अँड वॉच’मध्ये...

पिंपरी-चिंचवड महापालिका झाल्यापासून ते २०१७ पर्यंत महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व होते. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मानणारे येथे अनेक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आहेत. शहरातही 'ते साहेबांचे', 'हे दादांचे' तर 'ते ताईंचे,' अशी कार्यकर्त्यांमध्ये विभागणी देखील झालेली आहे. सत्तेची पदे आणि कोणत्याही निवडणुकीची उमेदवारी मिळवताना अनेकदा ही गटबाजी उफाळून येते. मात्र सध्या या कार्यकर्त्यांनी 'वेट अँड वॉच' ची भूमिका घेतली आहे.

भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले तर...

१) शहरात विरोधकच राहणार नाही
२) दोन्ही गटांतील निष्ठावंत पक्षापासून दूर
३) शिवसेना, मनसे, आप आदी पक्षांना फायदा
४) बंडखोरी रोखण्यास पक्षश्रेष्ठींचा लागणार कस

...हा वरिष्ठ पातळीवरचा विषय 

शरद पवार मोठे नेते आहेत. ते भाजपसोबत येतील की नाही हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. पक्षाचा आदेश अंतिम असेल. - शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजप

दोघेही एकत्र असावेत

आम्ही सध्या अजित पवारांसोबत आहोत. मात्र, शरद पवार व अजित पवार कोणासोबत जातात, यापेक्षा ते दोघेही एकत्र असावेत, ही आम्हा कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. - अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

शरद पवार भाजपसोबत युती करणे अशक्य

आजपर्यंत आपण ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबतच सहकारी गेले याचे दुःख आहे. शरद पवार भाजपसोबत युती करणे शक्यच नाही. हे स्वतः त्यांनीही वारंवार सांगितले आहे. जे संभ्रमात आहेत, त्यांनी पवार साहेबांसोबत उभे राहिले पाहिजे. - इम्रान शेख, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी पक्षाचा आदेश अंतिम

याआधी शहरात राष्ट्रवादीविरोधात काम केले. मात्र, आता त्यांच्यासोबत काम करावे लागणार आहे, यामुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांवर दडपण आहे. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी पक्षाचा आदेश अंतिम असतो. तो नाराज असला तरी पक्षासाठी काम करत असतो. - राजू दुर्गे, कार्यकर्ते, भाजप

कार्यकर्त्यांना शरद पवारांनी बळ दिले

शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र काम केले पाहिजे, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. मात्र, सध्याच्या वातावरणाने एकनिष्ठ कार्यकर्ता संभ्रमात पडला आहे. पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांना शरद पवारांनी बळ दिले तर अजित पवारांनी त्यांना मोठे करण्याचे काम केले. - सविता वायकर, कार्यकर्त्या, राष्ट्रवादी

Web Title: Visit sharad Pawar and ajit pawar ncp dominance in Pimpri chinchwad Both should work together activists want

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.