चिंचवड : आनंदाची उधळण करणारी दिवाळी घराघरांत साजरी होत असताना सीमेवर रक्षण करणारे जवान मात्र डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणात व्यस्त असतात. त्यांनाही या सणाचा आनंद मिळावा यासाठी प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंडचे दृष्टिहीन मित्र सीमेकडे रवाना झाले आहेत. दिवाळी फराळ व शुभेच्छा पत्र घेऊन हे बांधव पंजाब प्रांतातील फिरोजपूर, फाझिलका व अमृतसर भागात सीमारेषेवर तैनात जवानांसह यंदाची दिवाळी साजरी करणार आहेत.प्रेरणा परिवाराच्या वतीने ‘जवानांची दिवाळी’ हा उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी संस्थेचे सचिव सतीश नवले यांच्यासह सहा दृष्टिहीन बांधव व दोन डोळस सहकारी फिरोजपूर भागातील सीमारेषेवर रवाना झाले आहेत. चिंचवडमधील वीर विशाल संघाच्या वतीने यंदा जवानांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, कराड या भागातील शालेय विद्यार्थ्यांनी जवानांसाठी शुभेच्छा पत्रे तयार केली आहेत. हनुमंत जोशी, प्रवीण काछवा, संतोष परिट, बेला चोंढे, सुप्रिया शेलार, पूनम खुळे, मयूर काटे हे दृष्टिहीन बांधव यंदाच्या वर्षी या उपक्रमात सहभागी झाले आहेत.संस्थेच्या वतीने मागील पंधरा वर्षांत आसाम, श्रीनगर, अरुणाचल, इंडो-चायना, कारगिल, वाघा या सीमेवर जवानांची दिवाळी हा उपक्रम केला आहे. पुणे स्टेशनवरून प्रेरणा परिवाराचे हे सदस्य सीमारेषेकडे रवाना झाले. नगरसेविका माधुरी कुलकर्णी, शीतल शिंदे, राजेंद्र गावडे, सुनील रांजणे, दिलावर शेख, शैलेंद्र पांड्ये, वीर विशाल संघाचे अध्यक्ष नंदू लुणावत, आदित्य जाधव, पराग कुंकुलोळ यांच्यासह मॉडर्न हायस्कूल, लिंब्रा स्कूलचे विद्यार्थी व प्रेरणा परिवाराचे सदस्य उपस्थित होते. जवानांची दिवाळी या उपक्रमात अनेकांनी सहभाग दिला आहे. १० व ११ तारखेला सीमारेषेवर जवानांसह दिवाळी साजरी करणार असून, १४ तारखेला पुण्यात परतणार असल्याचे नवले यांनी सांगितले.
दृष्टिहीन बांधव सीमारेषेकडे रवाना, प्रेरणा परिवाराकडून ‘जवानांची दिवाळी’ उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 1:42 AM