पिंपरी: महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या मतदार जनजागृतीमध्ये शहरातील विविध स्वंयसेवी संस्थांच्या स्वंयसेवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वंयस्फुर्तीने मतदार जन-जागृती मोहिमेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या शहरातील विविध स्वंयसेवी संस्थांच्या पदाधिका-यासमवेत आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
आयुक्त कार्यालयातील बैठकीस सह आयुक्त दिलीप गावडे, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सुर्यकांत मुथियान, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, सांगली जिल्हा मित्रमंडळाचे अध्यक्ष रणजीत औटे, गायत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिरामण भुजबळ, ग्राहक पचांयत कोषाध्यक्ष रमेश सरदेसाई, घरकुल फेडरेशचे विश्वास कदम, पोलिस नागरिक मित्र संघाचे तुकाराम तनपुरे आदी उपस्थित होते.
आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, ‘‘निवडणूकीमध्ये मतदारांनी आपली मतदानाची महत्वपुर्ण भूमिका पार पाडून जनहितासाठी सक्षम व योग्य उमेदवार निवडून द्यावा. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदारांना चार उमेदवार निवडणून द्यावचे आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रभागात अ,ब,क,ड अशा चार जागांसाठी मतदान करावयाचे आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच वेळी चार उमेदवार निवडूण देण्याची संधी उपलब्ध आहे. सर्व प्रभागांमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त मतदान होण्यासाठी मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. यापूर्वी शहरात झालेल्या कमी मतदानाच्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रीत करुन विविध माध्यमांद्वारे मतदारांना मतदान करणेबाबत जनजागृती करावी.’’
डॉ. यशवतंराव माने म्हणाले, ‘‘या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेवरील कोणतेही एक बटन दाबून एकूण चार मते नोंदवून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकटी करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे. २१ फेब्रुवारी रोजी होणा-या महापालिका निवडणूकीत मतदानामध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढवावी. कोणत्याही आमिषाला व प्रलोभनाला मतदारांनी बळी न पडता मतदानाचा पवित्र हक्क बजवावा.’’ राजीव भावसार यांनी आभार मानले.