पिंपरी : राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फलक लावल्यास महापालिकेचे अधिकारी ते फलक हटविण्याची घाई करतात. एवढेच नव्हे तर दंडात्मक कारवाइचे पाऊल उचलतात. निवडणुकीच्या काळात फेब्रुवारीमध्ये महापालिकेने जनजागृतीसाठी लावलेले फलक मात्र निवडणूक उलटून दोन महिने झाले तरी आहे त्या जागेवरच आहेत. संबंधितांवर महापालिका प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने निवडणूक काळात शहरात सर्वत्र नाही; परंतु काही प्रभागात जनजागृती फलक लावले होते. हे फलक लावण्यामागे जनगजागृती हा उद्देश असल्याचे भासवले गेले तरी विशिष्ट नगरसेवकांच्या प्रभागात महापालिकेच्या खर्चाने त्यांचा प्रचार व्हावा. असाच उद्देश त्यामागे होता. अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे. ‘आमची सोसायटी १०० टक्के मतदान करणार, तुम्हीही मतदान करा’ अशा आशयाचे फलक चिंचवड, अजमेरा कॉलनी परिसरात लावले होते. वास्तविक पाहता, शंभर टक्के मतदान करण्याचे सोसायटीतील सर्व सदस्यांनी ठरविले असेल, तर त्यांनी असे जाहिरात फलक लावणे अपेक्षित होते. महापालिकेने पुढाकार घेऊन खर्च करण्याची गरज नव्हती. मतदार याद्या तपासल्यास ज्या भागात असे १०० टक्के मतदानाचे फलक लावले होते. त्या भागात १०० टक्के मतदान झालेले नाही. महापालिकेच्या खर्चाने मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी ही शक्कल लढवली होती. हे शहराच्या अन्य भागात असे फलक लावले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उपकाराची परतफेड म्हणून नगरसेवकांना निवडणुकीत मदत व्हावी, या उद्देशाने काही अधिकाऱ्यांनी जनजागृती फलक, मतदार जनजागृती पथनाट्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. पथनाट्यांचे सादरीकरण विशिष्ट भागातच झाले. पथनाट्यातूनही छुप्या पद्धतीने प्रचार करण्यात आला. एवढे सर्व काही झाल्यानंतर आता मतदार जनजागृती म्हणून लावलेले फलक काढून टाकण्याचे भान महापालिका अधिकाऱ्यांना राहिले नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
मतदान जनजागृती फलक ‘जैसे थे’च!
By admin | Published: May 05, 2017 2:39 AM