वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील वाकसई, मुंढावरे, सांगिसे, भाजे व लोहगाव या ५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासह सर्व सदस्य तसेच १४ ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकीचे मतदान मंगळवारी होणार आहे. पुसाणे, शिलाटणे, आपटी, मळवली, आंबी, येलघोल, टाकवे बुद्रुक, खांड, साते, खडकाळा (कामशेत), थुगाव, आंबेगाव, माळवाडी व वराळे या १४ ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांचा यात समावेश आहे.पाच ग्रामपंचायतीच्या तेरा जागा बिनविरोध झाल्या असून, यामध्ये मुंडावरे ग्रामपंचायत सरपंचांचा समावेश आहे़ तालुक्यातील उरलेल्या २९ जागांसाठी ६२ उमेदवार रिंगणात आहेत़ मुंडावरे ग्रामपंचायतीचे सरपंचपद बिनविरोध झाले असून, उर्वरित चार ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी चौदा उमेदवार रिंगणात राहिले आहेत. पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ३८ तर सदस्यत्वाच्या ४३ जागांसाठी १३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील सरपंचपदाच्या २३ व सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केलेल्या ७५ जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली असून, कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत, असे तहसीलदार रणजित देसाई यांनी सांगितले. पोलीस प्रशासनानेही संवेदनशील मतदान केंद्रावर जादा बंदोबस्त ठेवला आहे.
पाच ग्रामपंचायतींसाठी मावळात आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 6:18 AM