तळेगाव दाभाडे : जिल्हा परिषदेच्या इंदोरी - सोमाटणे गटात अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळ पासूनच मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. विशेषत: इंदोरी, माळवाडी, वराळे, गहुंजे, सोमाटणे, परंदवडी,उर्से, धामणे, बेबडओहळ , शिवणे या ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या. येथे सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या गटात सर्वत्र मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता .या गटात कमळ फुलणार की घड्याळाची टिकटिक ऐकायला मिळणार हे गुरूवारी २३ तारखेलाच समजेल.अनेक शेतकरी मतदारांनी सकाळीच मतदान केले. त्यानंतर अनेकांनी शेतातील कामास प्राधान्य दिल्याचे पहावयास मिळाले. हा गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असल्याने मिनी आमदारकीची लढत या ठिकाणी जाणवली. राष्टृवादी कॉँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे व भारतीय जनता पक्षाचे पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य नितीन मराठे या उमेदवारांमध्ये मुख्य सामना असून निकालाच्या कौलाबाबत दोन्ही पक्ष आशावादी आहेत. शिवसेना व कॉँग्रेस पक्षाने या गटात उमेदवार उभा केला नसल्याने येथील निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. पहिल्यापासूनच मिनी आमदारकी म्हणून या गटाकडे पाहिले गेले. दोन्ही प्रमुख उमेदवारांची मातब्बर राजकीय घराणी असल्याने येथे प्रचाराची राळ उडाली. (वार्ताहर)
बंदोबस्तात शांततेत मतदान
By admin | Published: February 22, 2017 2:39 AM