- योगेश्वर माडगूळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरवासीयांवर स्वरांची बरसात करण्यासाठी आयोजित स्वरसागर महोत्सवातील ढिसाळ नियोजनामुळे स्वरच अडखळले. नियोजित वेळी श्रोते न आल्याने कार्यक्रम तब्बल दीडतास उशिरा सुरू झाला. त्यानंतर साऊंड सिस्टीम नादुरुस्त झाल्याने कार्यक्रम रात्री उरकता घ्यावा लागल्याने श्रोते नाराज झाले.
सोशल ट्रस्टच्या माध्यमातून निगडी येथे या महोत्सवाचे आयोजन केले होते. स्वरसागर महोत्सव गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू होणार होता. मात्र, कार्यक्रमाला उशिरा होऊ लागल्याने वेळेवर उपस्थित पे्रक्षक टाळ्या वाजवत होते. पण ध्वनियंत्रणेचे स्वर जुळत नसल्याने संयोजकही हतबल झाले होते. सुप्रसिद्ध पखवाजवादक पंडित भवानीशंकर यांचे पखवाजवादन झाले. त्यानंतर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ‘सूर नवा, ध्यास नवा’ संगीत कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सहा गायकांचा छोटे सूरवीर हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या वेळी ध्वनिव्यवस्था बिघडली. ध्वनिक्षेपक आणि साउंड यांचे स्वर जुळले नाहीत.निवेदकाची उडाली तारांबळप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अनेक वेळा ध्वनिक्षेपक आणि ध्वनियंत्रणा यात बिघाड होत असल्याने त्यांचीही तारांबळ उडाली. ध्वनिक्षेपकात चेक म्हटल्यानंतर त्या सावरून घेत आता आपण कार्यक्रम सादर करू या, असे सांगत होत्या. महोत्सवाचे मार्गदर्शक व महोत्सवाचे सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे यांनी कार्यक्रमाला लवकर येण्याविषयी श्रोत्यांना जाहीर विनवणी केली.बालकलाकारांनी दाखविली चमकउत्कर्ष वानखेडे याच्या ‘दाता तू गणपती...’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सई जोशी हिने आनंदी गोपाळ या चित्रपटातील ‘वाटा वाटा...,’ ‘अधिर मन झाले...’ ही गीते सादर केली. चैतन्य देवढे याने, कोणता झेंडा घेऊ हाती हे गीत सादर करीत उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले, तर सृष्टी पगारे हिने ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ हे गीत सादर केले. स्वराली जाधव हिने ‘लंबी जुदाई...’ हे गीत सादर केले.