वडगाव मावळ - येथील नगर पंचायत हद्दीत सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने लावलेले हायमास्ट दिवे मावळच्या तहसीलदारांनी अचानक बंद करून गावाला अंधाराच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये तहसीलदारांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दिवे तुम्हाला लावता येत नसतील, तर राहू द्या़ परंतु लावलेले दिवे विझवणारा हा तहसीलदार केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकमेव असावा असा विकास विरोधी तहसीलदाराची त्वरित बदली करावी, अशी मागणी मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.1वडगाव मावळ गावाची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन सामाजिक कार्यकर्ते मयूर ढोरे यांनी स्वखर्चाने गावातील वेगवेगळ्या २१ ठिकाणी हायमास्ट दिवे लावले आहेत. वडगावातून या कामाचे कौतुक होत असताना तहसीलदार रणजित देसाई यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता सर्व दिवे अचानक बंद करून टाकले असल्याचा आरोप ढोरे यांनी केला आहे. याच परिसरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावलेले दिवे मात्र तहसीलदारांनी बंद केले नाहीत़ त्यामुळे असा दुजाभाव का असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करत आहेत.2तहसीलदार प्रशासकीय अधिकारी आहेत की भाजपाचे हस्तक असा सवालही निवेदनात विचारण्यात आला आहे. वडगाव नगरपंचायतीला कोणताही आर्थिक फटका न बसता सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने हे दिवे लावले होते हे दिवे तहसीलदारांनी अचानक बंद केल्याने गावात रात्रीचा भयानक अंधार पसरला आहे. भुरट्या चोऱ्यांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. रात्री गरमीच्या दिवसात महिला घरातून बाहेर जेवणानंतर फिरायला यायच्या त्या ही आता बंद झाल्या आहेत.3रात्रपाळीवरून येणाºया कामगारांमध्ये असुरक्षित वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हे दिवे बंद करणाºया विकास कामांना विरोध करणाºया तहसीलदारांची त्वरित बदली करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे बाळासाहेब ढोरे यांनी केली आहे. जर येत्या १० दिवसांत तहसीलदारांवर कारवाई झाली नाही, तर मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही त्यांनीदिला आहे.विकासाची कामे व्हावीत, यासाठी प्रशासकीय अधिकाºयांनी पुढाकार घ्याचा असतो, याउलट तहसीलदार सत्ताधारी पक्षाच्या दबावाला बळी पडून गावात झालेली विकासाची कामे बंद पाडू लागले आहेत. सत्ताधाºयांच्या दबावाला बळी पडून तहसीलदार दुजाभाव करत असल्याचा आरोप कॉँग्रेस करीत आहे. तहसीलदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.सामाजिक कार्यकर्त्यांनी लावलेले दिवे हे परवानगी न घेता नगर पंचायतच्या कनेक्शनवर लावले होते. या विरोधात नागरिकांच्या तक्रारी आल्याने हे दिवे बंद करण्यात आले. जर त्यांना दिवे लावायचे असतील, तर नगर पंचायतीमध्ये ठराव करावा लागतो त्या विभागात गरज असल्यास ठराव संमत करून दिवे लावता येतील. हे दिवे नगर पंचायत कनेक्शनवर लावले असल्याने बंद करण्यात आले आहेत. वडगावमध्ये असे इतर अनधिकृत दिवे असल्यास तेही नागरिकांच्या तक्रारीनुसार बंद करण्यात येतील.- रणजीत देसाई, तहसीलदार,वडगाव मावळ
दिव्यांवरून रंगला कलगी तुरा, कार्यकर्त्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 3:16 AM