वडगाव मावळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दप्तरदिरंगामुळे मावळ तहसीलदार निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, भिंतींना निसर्गानेच रंग दिला आहे. निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे. स्वच्छ भारत सुंदर भारत असा नारा देणाºया शासनाचे निवासस्थान कधी चकाचक होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.मावळ तहसीलदार निवासस्थान इमारतीचे बांधकाम ३ जुलै १९८७ला झाले. तहसीलदार सचिन बारवकर यांनी २०१२ पर्यंत या इमारतीत वास्तव केले. तहसीलदार देवदत्त ठोंबरे, शरद पाटील, जोगेंद्र कट्यारे, रणजीत देसाई हे निवासस्थानात राहिले नाही. प्रत्येक तहसीलदाराने निवासस्थानाच्या दुरुस्तीची मागणी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.विभागाने चालढकल करत काही वर्ष घालवले. या परिसरात इमारतीची संरक्षण भिंत तुटली असून, भिंतीवर शेवाळ साचले आहे. दारे-खिडक्या तुटल्या आहेत. पावसामुळे परिसरात पाणी साचले आहे.सार्वजनिक बांधकामखात्याच्या उदासीनतेमुळे निवासस्थानाची दुरुस्ती रखडली आहे. भितींना शेवाळ असल्याने हिरवा रंग आला आहे. तहसीलदार यांना असलेले निवासस्थान असूनही दुरुस्तीअभावी भाडेतत्त्वावर राहण्याची वेळ आली आहे.मावळ तालुक्यामध्ये जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे तहसीलदार हे अत्यंत महत्त्वाचे पद बनले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी निवासस्थान असणे गरजेचे आहे. परंतु या ठिकाणी निवासस्थान उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तहसीलदारांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.
वडगाव मावळ : तालुक्याच्या राजाला नाही घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 1:51 AM