पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध रुग्णालयात रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका आरोग्य विम्यापासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शहरातील या परिचारिकांना साहित्य मिळत असले तरी त्यांचा आरोग्य विमा कधी उतरवणार, असा सवाल केला जात आहे. महापालिकेच्या आखत्यारित सध्या ५६५परिचारिका आपले कर्तव्य बजावत आहेत. रुग्णसेवा करताना त्यांना महापालिकेच्या वतीने संसर्गजन्य आजाराच्या बचावासाठी हातमोजे, मास्कसह विविध सुविधा दिल्या जात आहेत. मात्र संसर्गजन्य विभागात काम करणाऱ्या परिचारिकांना विमा देणे गरजेचे आहे. सध्या आजाराची लागण होऊन मृत्यू झाल्यास शासनाकडून कोणत्याही आरोग्य विम्याचे संरक्षण दिलेले नाही. परिचारिकांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र गर्व्हन्मेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने करण्यात येत आहे. महापालिकांतर्गत आठ रुग्णालयांचा समावेश होतो. यामध्ये संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) व चिंचवड येथील तालेरा रुग्णालयासारखी मोठी रुग्णालये आहेत. भोसरी येथे देखील शंभर खाटांचे रुग्णालय होणार आहे. या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णांची संख्याही वाढत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिका रुग्णालयांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. यासाठी महापालिकांतर्गत मानधनावर व कायमस्वरूपी कामासाठी परिचारिकांची नेमणूक केली जाते. आरोग्य विभागाकडे विम्याबाबत सातत्याने मागणी करूनही सरकार परिचारिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. क्षयरोग, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजार जडलेल्या रुग्णांची सेवा करताना परिचारिकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणारे विमा संरक्षण नाही. त्यामुळे या परिचारिकांना संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यास जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नर्सेस असोसिएशनतर्फे परिचारिकांना आरोग्य विम्याचे संरक्षण देण्यासाठी मुंबईत आंदोलनही करण्यात आले.(प्रतिनिधी)
आरोग्य विम्याची प्रतीक्षा
By admin | Published: January 30, 2017 2:52 AM