रावेत : बदलत्या वातावरणामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा पारा शहरात वाढत चालला आहे. पुढील चार महिने शहराला तीव्र उन्हाळ्यास सामोरे जावे लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे तहानलेल्या नागरिकांची, विद्यार्थ्यांची पावले पाणपोईचा शोध घेत आहेत. मात्र शहरात पाणपोईचाच दुष्काळ असल्याने बाटलीबंद पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. शहरातील नागरिकांना विशेषत: विद्यार्थिवर्ग, वयस्कर व्यक्तींना शुद्ध जल पिण्यासाठी उपलब्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात शाळा-महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण शिक्षण घेत आहेत. त्यांपैकी १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अद्याप शालेय परिसरात, महाविद्यालय परिसरात, शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुद्ध पाणी मिळत नसल्याचे प्राधिकरण सुरक्षा समितीच्या सर्वेक्षण पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांना बाटलीमधील पाणी विकत घेऊन पिणे परवडत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी पाणपोईवर तहान भागवतात. या समितीच्या सदस्यांनी नुकतीच शहरात प्रमुख १६ ठिकाणच्या रस्त्यांवर पाहणी केली. या सर्व ठिकाणी महापालिकेने त्वरित विद्यार्थी शुद्ध पेयजल योजनेंतर्गत पाणपोई उभारण्याची आवश्यक आहे, असा निष्कर्ष नोंदविला. शाहूनगर,चिखली, आळंदी रोड, वाल्हेकरवाडी, रावेत, चिंचवड स्टे, चिंचवडगाव, आकुर्डी रेल्वे स्थानक, मोशी, भोसरी, पिंपरी रेल्वे स्टेशन, निगडी-यमुनानगर, तळवडे, हिंजवडी चौक,वाकड चौक, थेरगाव या प्रमुख १६ ठिकाणांवर त्वरित पेयजल फिल्टर पाणपोई महापालिकेने बसविणे गरजेचे आहे. निगडी प्राधिकरण येथे संभाजी चौैकाजवळ एका दानशूर उद्योजकाने स्वखर्चाने शुद्ध जल पाणपोई उभारली आहे. दररोज हजारो विद्यार्थी, नागरिक, कामगार तिचा लाभ घेत आहेत. गेली अनेक वर्षे सदरची व्यक्ती हजारो रुपये खर्च करून पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करीत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये सदरचा विषय नवनिर्वाचित नगरसदस्यांनी त्वरित मांडावा आणि ‘शुद्धजल पाणपोई’ विषय मंजूर करवून घ्यावा. महापालिका आयुक्तांनीसुद्धा सदर विषयाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)... तर उन्हाळा होईल सुसह्ययंदा उन्हाच्या झळा फेब्रुवारीपासूनच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे रोज उन्हातान्हात पायपीट करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासत आहे. उपनगरांमधून पिंपरीसारख्या शहरात शिकण्यासाठी हजारो विद्यार्थी येत असतात. शिवाय व्यवसाय, खरेदीसारख्या कामानिमित्तदेखील हजारो नागरिकांची ये-जा असते. या लोकांच्या तहानेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे या लोकांकडून नाईलाजाने बाटलीबंद पाणी खरेदी केले जाते. हा प्रश्न दूर करण्यासाठी महापालिकेने ठराविक अंतरावर शुद्ध पाण्याच्या पाणपोई बसविणे गरजेचे आहे. तसेच या पाणपोईंची नियमित देखभाल ठेवणेही आवश्यक आहे. अशा पाणपोर्इंमुळे यंदाचा उन्हाळा काही प्रमाणात का होईना सुसह्य होईल.
शहरवासीयांना पाणपोईची प्रतीक्षा
By admin | Published: March 27, 2017 2:48 AM