पिंपरी: मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्याला रविवारी दुपारी दीडच्या सुमारास अटक केली. तर पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला शनिवारी अटक केली आहे. वाकड पोलिसांनी रतन रोकडे (वय २१ रा. रोकडे वस्ती, चिखली) असे मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीतील आरोपीला देहुरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. तर मंगेश नामदेव पालवे (वय२८, रा. मोरेवाडी, ता. मुळशी) या पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी दीडच्या सुमारास कस्पटे वस्ती येथील कस्पटे चौकात वाकड पोलीस ठाण्यातील पथक क्रमांक १० आणि १७ कारवाई करत होते. त्यावेळी देहूरोड पोलीस ठाण्यातील मोक्काअंतर्गत कारवाई झालेला रावण साम्राज्य टोळीतील फरार आरोपी रतन रोकडे तेथे उभा असल्याचे दिसुन आले.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.चौकशी करून तो मोक्काच्या गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यास अटक केली. त्याच्यावर चिंचवड, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. देहूरोड पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली आहे. वाकड पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आदल्या दिवशी शनिवारी वाकड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने भूमकर चौकात खुनाच्या आरोपातील फरार आरोपीला पकडले. मंगेश पालवे असे त्याचे नाव आहे. पोलिसांना पाहून पळून लागताच, पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. चौकशी केली असता तो पौड पोलीस ठाण्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे उघड झाले. त्याच्यावर पौड पोलीस ठाण्यात तीन आणि तळेगाव पोलीस ठाण्यात एक असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उप निरीक्षक हरीश माने, सहायक पोलीस फौजदार शिंपी, पोलीस कर्मचारी कांता बनसोडे, नितीन गेंजगे, मुकेश येवले, सचिन जगताप, प्रशांत गिलबिले, अविनाश गायकवाड यांच्या पथकाने केली.