पिंपरी : व्यवसायातील आर्थिक वादातून खून करून फरार झालेल्या आरोपीला उत्तर प्रदेश येथून जेरबंद करण्यात आले. तीन महिन्यांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. वाकडपोलिसांनी ही कारवाई केली.
संदीप उर्फ घुंगरू लालजी कुमार (वय २१, रा. भदोही, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश सुभेदार पवार (वय ३७, रा. काळेवाडी, मूळ रा. वेल्हा, ता. पुरंदर), अरविंद उर्फ सोन्या गणेश घुगे, मंगेश भागुजी जगताप (वय ३९, रा. चिंचवडगाव) यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. संतोष शेषराव अंगरख (वय ४२, रा. पोलीस कॉलनी, रहाटणी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
आरोपी यांनी व्यवसायातील आर्थिक वादातून संतोष अंगरख यांचे रहाटणी, काळेवाडी येथून अपहरण करून खून करून कासारसाई येथे त्यांचा मृतदेह पुरला. १६ ऑगस्ट २०२० रोजी हा प्रकार घडला. त्यानंतर आरोपी फरार झाले. आरोपी उत्तर प्रदेश येथे पळून गेले असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाकड पोलिसांनी आरोपी घुंगरू याला जेरबंद केले.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन गेंगजे, शाम बाबा यांनी ही कामगिरी केली.