पिंपरी : कोरोनाचा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना ५०० तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड पोलिसांकडून आकारण्यात येईल. दंडाची रक्कम न देणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये खटला दाखल केला जाईल.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी, प्रवासात नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकू नये, असे निर्देश आहेत. जिल्हाधिका-यांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दंड आकारणीची कारवाई अधिक प्रभावी होण्यासाठी कारवाईचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानुसार विनामास्क फिरणा-यांवर वाहतूक विभाग आणि पोलीस ठाण्यांकडून कारवाई होईल.
चारचाकी वाहनात एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र प्रवास करत असतील तर त्या सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. जाणीवपूर्वक विनामास्क एकत्र प्रवास करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होईल. चारचाकी वाहनातून एकच व्यक्ती प्रवास करत असेल आणि त्या व्यक्तीने मास्क घातला नाही तरी चालेल. मात्र, त्या व्यक्तीजवळ मास्क असणे बंधनकारक आहे.
व्यायामादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यकदुचाकीवरून प्रवास करणा-या दोन्ही व्यक्तींनी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. शारीरिक व्यायाम करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून व्यायाम करावा. जॉगिंग, सायकलिंग करताना मास्क घालणे बंधनकारक नाही. मात्र मास्क सोबत बाळगणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने वैद्यकीय कारणांसाठी मास्क घातला नसेल तर चालेल. परंतु त्याची पोलिसांकडून शहानिशा होईल.