लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत सदस्यनिवडीबाबत भारतीय जनता पक्षाने कमालीची गुप्तता बाळगली आहे. भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवारी सकाळी अकराला नावे देणार आहेत. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे.महापालिकेच्या सभागृहात १२८ सभासद निवडून आले आहेत. त्यापैकी पक्षांना मिळालेल्या जागांनुसार ५ स्वीकृत नगरसेवकांची निवड सभागृहामध्ये करता येणार आहे. महापालिकेमध्ये संख्याबळानुसार भाजपाला ३, राष्ट्रवादी काँग्रेसला २ असे स्वीकृत नगरसेवक सभागृहामध्ये पाठविता येणार आहेत. स्वीकृतचे अर्ज मंगळवारी सकाळी दाखल करायचे असून, यावर कोणाची वर्णी लागणार याबाबत भाजपाने दक्षता घेतली आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश पदाधिकारी महेश कुलकर्णी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, माजी नगरसेवक शंकर जगताप, अमर मूलचंदानी, सारंग कामतेकर, शांताराम भालेकर, विजय फुगे, सचिन लांडगे, मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस बाबू नायर, सूरज बाबर, निहाल पानसरे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, विजय गावडे, संजय वाबळे, उल्हास शेट्टी, जालिंदर शिंदे, तानाजी खाडे, नीलेश पांढरकर, सेवा दलाचे आनंदा यादव यांच्या नावाची चर्चा आहे. दोन्हीही पक्षांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.
स्वीकृतसाठी इच्छुकांचा जीव टांगणीला
By admin | Published: May 09, 2017 3:53 AM