लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : आळंदी-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने चालले आहे. त्यामुळे याही वर्षी वारकरी बांधवांची पंढरीची वाट बिकटच असल्याचे दिसून येत आहे. देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर अशा ५०० किलोमीटर पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चऱ्होली-दिघी परिसरात अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरूही करण्यात आले नाही. त्यातच या रस्त्याच्या बांधकामात अनेक तांत्रिक व नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक त्रुटी असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यातच अर्ध्याहून अधिक रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने महिनाभरात देहू व आळंदीला पंढरपूर वारीसाठी जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे. आळंदीपासून चऱ्होलीपर्यंत रस्ता रुंदीकरणास अद्याप सुरुवातही झाली नाही. चऱ्होली फाटा ते वडमुखवाडी या भागात रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे; पण पदपथ व रस्ता दुभाजकाचे काम अपूर्ण आहे. साई मंदिर परिसरातील पदपथांचा राडारोडा अद्यापही हटवलेला नाही. ड्रेनेजची संरक्षक झाकणेही ठिकठिकाणी धोकादायरीत्या उघडी आहेत. मॅगझिन चौक ते दिघीपर्यंतचे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गाचे पथदिवे व पदपथांचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचे रुंदीकरणाची झाले आहे; पण दुभाजक रस्त्याच्या मधोमध मांडून ठेवले असल्याने अपघातांचा धोका संभवतो. एकंदरीत रस्ता रुंदीकरणाच्या कामात नियोजनाचा अभाव असून, सुसूत्रता नसल्यानेच कामास विलंब लागत आहे. महिनाभरात काम पूर्ण होणे निव्वळ अशक्य असल्याचे परिसरातील नागरिकांचे मत आहे. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाचे रुंदीकरण, सुशोभीकरण, तसेच वारकरी बांधवांसाठी निवास व्यवस्था, दोन्ही बाजूस स्वच्छतागृहे उभारण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे दिलेले आश्वासन फोल ठरल्याचे दिसत आहे. त्याचा त्रास लाखो वारकरी बांधवांना सहन करावा लागणार आहे.संतसृष्टीचे कामही धीम्या गतीने विसावा पादुका चौकात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराजांच्या भेटीचे महाराष्ट्रातील सर्वांत भव्य समूहशिल्प साकारले जात आहे. त्याच्या पहिल्या फेजमधील चबुतऱ्याच्या कामाला नुकताच प्रारंभ झाला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या मुख्य शिल्पासमवेत संत सोपानदेव, निवृत्तिनाथ, मुक्ताबाई आणि वारकरी असे एकूण २६ पुतळे या शिल्पात असणार आहेत; पण रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबतच या कामालाही दिरंगाई होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे.
वारकऱ्यांची वाट अद्यापही बिकटच
By admin | Published: May 11, 2017 4:27 AM