देहूरोड : देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावर देहूरोड लष्करी हद्दीत अशोकनगर-चिंचोलीपासून ते झेंडेमळा दरम्यानच्या रस्त्यावर पावसाळ्यात पडलेल्या लहानमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त देहू-आळंदीला येणाऱ्या भाविकांना व वाहनचालकांना खड्डे चुकविताना कसरत करावी लागली. यासह कॅन्टोन्मेंटचे काही पथदिवे बंद असल्याने खड्डे चुकविताना वाहने आदळून वाहने बंद पडल्याचे प्रकार घडत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडले असून, संपूर्ण चार महिन्यांच्या काळात एकही खड्डा दुरुस्त करण्यात आलेला नाही. या रस्त्यावरून तळवडे आयटी पार्ककडे ये-जा करणारी अभियंत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या मोटारी, चाकण एमआयडीसीकडे ये-जा करणारी वाहने, पंचक्रोशीतील वाहनांची तसेच देहूगाव येथे संत तुकाराम महाराजांच्या व ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची वर्दळ असतानाही कार्तिकी वारीपूर्वी प्रशासनाने खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले.
चिंचोलीत सर्वाधिक खड्डेचिंचोली गावाजवळ सर्वाधिक खड्डे पडले असून, या रस्त्यावर वाहनांची सार्वधिक वर्दळ असल्याने रस्त्यावरील खड्डे चुकविणे अनेकदा शक्य होत नाही. वाहनचालकांना नाईलाजास्तव खड्ड्यात वाहने घालावी लागत असून, त्यामुळे वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. मंगळवारी सकाळपासून दोन मोटारी व एक पीएमपी बस बंद पडल्याचे दिसून आले. रस्त्यावरील खड्ड्यांची लांबी, रुंदी वाढत चालली असून, खड्डे खोलगट व पसरट होत चालले आहेत. चारचाकी वाहने खड्डे चुकविताना थेट अंगावर येत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.