पिंपरी : एकेकाळी जुन्या दुचाकीवर फिरणारे भुरटे भाईगिरी करू लागल्यापासून आलिशान वाहने वापरताना दिसून येत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून अंडरवर्ल्डला हप्ता जातो, हे खळबळजनक वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) विभागाची या भागाकडे करडी नजर असून, कोणीतरी गळाला लागण्याची शक्यता आहे. शहरात आलिशान मोटारीतून फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आलिशान वाहनांमधून फिरणाऱ्यांमध्ये केवळ उद्योजक नव्हे, तर लँड माफिया, जमीन खरेदी-विक्री करणारे दलाल, भाई असे लोक आहेत. आलिशान मोटारी वापरणाऱ्यांमध्ये उद्योजकांपेक्षा इतरांचे प्रमाण या शहरात मोठे आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील अनेकांनी सुमारे दोन हजार कोटींचा प्राप्तिकर थकवल्याचे उघडकीस आले आहे. प्राप्तिकर विभागाने त्यातील बहुतेकांना नोटीस पाठविल्या आहेत. या नोटीस पाठविल्यानंतर गुन्हेगारीजगतात खळबळ उडाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील लोकांना नोटीस पोहोचल्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचतील, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. संपत्तीचे खुलेआम प्रदर्शन करणारे शहरातील महाभाग प्राप्तिकर विभागाच्या जाळयात का अडकत नाहीत, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. प्राप्तिकर विभागाला थकीत वसुलीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा नव्याने प्राप्तिकर भरणारे अनेकजण सापडतील, अशी परिस्थिती शहरात आहे. (प्रतिनिधी)प्राप्तिकर विभागाने ज्यांना नोटीस पाठविल्या त्यांच्यापैकी ३० हून अधिक लोकांचा पत्ता नाही. ज्या पत्त्यावर नोटीस पाठवल्या, त्या ठिकाणी ते लोक राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नावाला उद्योजक प्रत्यक्षात दुसऱ्याच धंद्यात सक्रिय अशा लोकांपर्यंत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी पोहोचतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. या शहरात हातातील पाचही बोटांत सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात मोठे गोफ, हातात ब्रेसलेट अशा आभूषणांचे प्रदर्शन घडविणाऱ्यांकडे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष गेले, तर प्राप्तिकर विभागाच्या महसुलात निश्चित वाढ होईल. शिवाय असे ओंगळवाणे प्रदर्शन रोखले जाईल. सावकारी दुर्लक्षितव्याजाने पैसे द्यायचे, मनमानी पद्धतीने वसूल करायचे, असा व्याजाने पैसे देणाऱ्यांचा धंदा तेजीत आहे. कोणत्याही प्रकारचा सावकारी व्यवसायाचा, व्याजाने पैसे देण्याचा परवाना नसलेले अनेक जण आहेत. ते ज्यांना कर्ज स्वरूपात व्याजाने पैसे देतात, त्यांची पिळवणूक करतात. त्यांच्याकडून आगाऊ धनादेश घेऊन ठेवतात. व्याजाने पैसे देऊन मनमानी पद्धतीने वसूली करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली आहे. असे अनेक जण प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित राहिले आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्राप्तिकर विभागाचा वॉच
By admin | Published: October 17, 2015 1:01 AM