पिंपरी : बंगल्याच्या दरवाजाचे लॅच उचकटून घरातील दागिने आणि रोख रक्कम असा ९७ लाखांचा ऐवज चोरल्याची घटना निगडी येथील भक्ती-शक्ती चौकाजवळ घडली. कार्यक्रमानिमित्त सर्वजण बाहेरगावी गेल्याचा चोरट्याने गैरफायदा उठवला. या बंगल्यात काम करणाºया नोकरानेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,घरमालक विनोद बन्सल (रा. निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंद परिहार (वय ३५, रा. नेपाळ) या नोकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बन्सल कुटुंबीय नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. गोविंद हा बन्सल यांच्या सोसायटीमध्ये रखवालदार म्हणून काम करीत असे. शनिवारी रात्री घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा उठवित त्याने बन्सल यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे लॅच तोडले. घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ८० लाख रुपये किंमतीचे दागिने आणि १७ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज घेऊन तो पसार झाला.
रविवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सर्व तपास पथके घटनास्थळी दाखल झाली असून आरोपीला शोधण्याचे काम सुरू आहे.