पिंपरी : पवना धरण १०० टक्के भरले असतानाही शहरात ऐन सणासुदीच्या तोंडावर पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्याऐवजी आठवड्यातून एक दिवस, दिवसाआड आणि समान पाणीपुरवठा असे तीन प्रस्ताव तयार केले आहेत. शहरावरील पाणी संकटाविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेच्या हद्दीत दररोज ४८० ते ५०० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्येक व्यक्तीमागे साधारण २०० लिटर पाणीपुरवठा होतो. तरीही, शहरातील सर्वच भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे शहरातील विस्कळीत पाण्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला. गणपती उत्सवात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. नवरात्रात देखील शहराच्या अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. परतीचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाणीकपातीच्या प्रस्तावाची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी दिली. शहर परिसरात विस्कळित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
समान पाणीपुरवठ्याची मागणी प्रशासनाच्या पाणीकपातीच्या प्रस्तावाला स्थायी समितीतील सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. शहराच्या सर्व भागात समान पाणीपुरवठा करण्याची मागणी भाजपाचे विकास डोळस व राष्ट्रवादीचे शरद मिसाळ यांनी केली. शहराच्या काही भागात अधिक दाबाने, तर दुसऱ्या भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व भागांत सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी सूचना विलास मडिगेरी यांनी केली.
परतीचा पाऊस न झाल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याविषयी जलसंपदा विभागाचे पत्र आले आहे. पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी पाणी कपातीचे प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तयार केले आहेत. गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच, सर्वसाधारण सभेतही नगरसेवक पंकज भालेकर, मयूर कलाटे व सुलक्षणा धर यांनी दिलेल्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.- राहुल जाधव, महापौर