पिंपरी : औद्योगिकनगरीची जीवनदायिनी असणाऱ्या पवना धरणात सध्या ८८ टक्के पाणीसाठा आहे. तो पुढील मेपर्यंत पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तूर्तास पाणी कपात करण्याचे नियोजन नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे.
मावळातील पवना धरणातूनपिंपरी-चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. रावेत येथील जलउपसा केंद्रातून पाणी उचलून प्राधिकरणातील शुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तिथे पाण्यावर प्रक्रिया करून जलवाहिनीच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत पाणी पोहोचवले जाते.
पावसाचे प्रमाण कमी
यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. मावळ परिसरात आजपर्यंत २८३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये ७.५३ टीएमसी साठा आहे. गेल्यावर्षीपेक्षा १२ टक्के साठा घटला आहे. गणेशोत्सवानंतर पावसाने ओढ दिली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिले तर पाणी कपातीचे संकट येणार आहे.
पाणी कपातीचे नियोजन नाही
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चार वर्षांपासून दिवसाआड पाणी सुरू आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे तूर्तास आणखी पाणी कपात करण्याचे नियोजन नाही. पाणीसाठा कमी झाल्यास जलसंपदा विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा
मावळातील पवना धरणातून आता जेवढे पाणी सोडले जाते, तेवढीच मागणी राहिली तर मेपर्यंत पाणी पुरेल. त्यापेक्षा मागणी कमी झाली तर जुलै-ऑगस्टपर्यंत पाणी पुरवता येईल. मावळातील पवना धरणामध्ये गेल्यावर्षी याच महिन्यामध्ये ९० साठा होता. तो आता कमी झाला आहे.
- रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण.