पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपात सुरू असल्याने काही भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, शहरातील अनेक वॉशिंग सेंटर पाण्याचा अपव्यय करत आहेत. याकडे महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. शहरात शेकडो वॉशिंग सेंटर असताना पालिकेकडून फक्त ५० सेंटरची पाहणी केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत असताना वॉशिंग सेंटरला पाणी येते कुठून, हा संशोधनाचा विषय बनला आहे. दिवसाकाठी असंख्य वाहने महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यातूनच धुतली जात असल्याची तक्रार वॉशिंग सेंटर परिसरातील रहिवासी करीत आहेत. नळाला थेट मोटार जोडून वॉशिंग सेंटरचे मालक पाण्याचा उपसा करून ते टाक्यामध्ये साठवून ठेवतात. हजारो लिटर पिण्याचे पाणी वाहने धुण्यासाठी वापरले जात आहे. शहरातील वॉशिंग सेंटरची तपासणी करून पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.
टँकर लॉबी सक्रियपाणी कपात सुरू झाल्यापासून काही भागामध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ज्या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने झाल्यास, पाणी येत नाही, गढूळ पाणी येते. पाईपलाईन लिकेज आहे किंवा अन्य कारणांनी पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. तेथे महापालिकेच्या आणि खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेच्या टँकरऐवजी खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने टँकरलॉबी पुन्हा सक्रिय झाली आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचे टँकर फिरताना दिसत आहेत. झोपडपट्टी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. असे असताना शहरातील वॉशिग सेंटर खुलेआम मोठ्या प्रमाणात पाणी वापरत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे महापालिका करू शकते, पिंपरी का नाही?उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असतानाच काही भागात पाणीटंचाई जाणवत आहे. गाड्या धुण्यासाठी ज्या वॉशिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर होतो, ती सेंटर बंद करण्यात येणार आहेत. बांधकामांसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर होत असेल, तर त्यावरही कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर कारवाई करण्याचा निर्णय पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला. दरम्यान, जूनपर्यंत नव्याने नळजोड न देण्याचा निर्णयही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. पुणे महापालिका करू शकते. पिंपरी महापालिका असे निर्णय घेऊ शकत नाही का? असा सवालही उपस्थित होत आहे.
फक्त ५० सेंटरचीच केली पाहणी...महापालिकेने वाकड, थेरगाव भागातील ५० वॉशिंग सेंटरची पाहणी केली. त्यांच्यापैकी एकाकडेही महापालिकेचे नळ कनेक्शन आढळून आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात वॉशिंग सेंटरची संख्या शेकडोच्या घरात असताना ठराविक ५० सेंटरची पाहणी करण्यात आली आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरात एकाही वॉशिंग सेंटरकडे महापालिकेची अधिकृत नळजोड नाही. रावेत, वाकड, थेरगाव या परिसरात आम्ही पाहणी केली आहे. पूर्ण शहरात पाहणी करत आहोत. पाहणी पूर्ण झाली की कारवाईला सुरवात करत आहोत.