पवनानगर : पिंपरी चिंचवड शहराला व मावळ तालुक्यात पाण्याचा मुख्य स्रोत असलेले पवना धरण ५३ टक्के भरले असल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. मावळात पावसाचे अर्धशतक झाले असून, पवना धरण ५३ टक्के भरले आहे.
धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या २४ तासांत १४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे २४ तासांत पाणीसाठ्यात ८.७९ टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. १ जूनपासून १,१७६ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे, तर दिवसभरात ५७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेस केवळ ६३२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती.
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ५४४ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे. पाणीसाठ्यात अर्धशतक पूर्ण झाले असून, धरणातील सध्याचा पाणीसाठा ५३.१९ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा ३४ टक्के इतका होता. पाऊस जोरदार सुरू असल्याने धरणातील येवा वाढला असून, पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.