- लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी कपातीवरून भाजपा आणि शिवसेनेत जुंपली आहे. आळंदीला पाणी देताना पिंपरी-चिंचवडकरांवर अन्याय का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. ‘महापौर नितीन काळजे यांच्या पाण्याच्या टँकरसाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे, असा आरोप शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी केला आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचे कारण पुढे करून महापौरांनी दिवसाआड पाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिनाभराचा कालखंड होत आला तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाणीपुरवठा विभागाला कोणीही वाली नसल्याने, वचक नसल्याने त्याचा परिणाम शहरातील नागरिकांवर होत आहे. महापौर आयुक्तांनी बैठक घेऊनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पिंपरी-चिंचवडला पाणी पुरेसे नसताना महापौरांनी आळंदीला पाणी देण्याचा निर्णय घेतला. याबाबत ‘लोकमत’नेही टँकर माफीयांचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी टँकर लॉबीसाठी पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र,महापौरांनी हा आरोप धुडकावून लावला. कोणतीही टँकर लॉबी कार्यरत नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. शहरप्रमुख राहुल कलाटे म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे वास्तव सत्ताधारी आणि प्रशासन मान्य करीत नाहीत. टँकर लॉबीसाठी पाणीटंचाई केली जात आहे. नागरिकांना वेठीस धरणे योग्यनाही. शनिवारी पुणे वेधशाळेने सरासरीच्या शंभर टक्के पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा विचार करता शहरवासीयांवर लादलेली पाणी कपात त्वरित मागे घ्यावी, अन्यथा पुढील आठवड्यात हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू.’’शिवसेनेचे पदाधिकारी निवडणुकीत झालेला पराजय व नैराश्यातून आरोप केले जात आहेत. उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार आहे. माझे कोठे आणि कोणते टँकर आहेत. हे दाखवून द्यावे. उगाच खोटे आरोप करू नयेत.- नितीन काळजे, महापौर. महापौर नितीन काळजे यांचाच टँकरने पाणी पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्याच्यासाठीच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे. आळंदीला पाणी देण्यास विरोध नाही. लोकसभेसाठी हे पाणी दिले जात असेल तर जुन्नर आणि शिरूरपर्यंत पाणी द्यावे. - सुलभा उबाळे, माजी गटनेत्या, शिवसेना
महापौरांच्या टँकरसाठी पाणीटंचाई
By admin | Published: May 28, 2017 3:54 AM