पिंपरी : पाणीकपातीचे धोरण निश्चित करण्यात आले नाही. याबाबत लवकरच गटनेते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून, सर्व पक्षांचे गटनेते, महापौर, स्थायी समिती पदाधिकारी, प्रशासन आणि जलसंपदा विभागाचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होणार असून, आठवडाभरात दिवसाआड पाणी याबाबत निर्णय होणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकांराशी बोलताना सांगितले. पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडून रावेत येथील जलउपसा केंद्रातून हे पाणी उचलले जाते. ते पाणी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागांतील नागरिकांना पुरविले जाते. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यातच पवना धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध पाणीयोजना, तळेगाव, उर्से, वडगाव मावळ या भागातील पाणीयोजनांना वर्षभर पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे पाटबंधारे विभागाने सूचित केले होते. पवनेत ४५.७९ टक्के साठापवना धरणातून वीजनिर्मिती आणि पिंपरी-चिंचवडला पिण्यासाठी दिवसाला ४५० एमएलडी पाणी सोडले जाते. पवना धरणाची एकूण क्षमता १० टीएमसी आहे. धरणात ४५.७९ टक्के पाणीसाठा आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. पाणीसाठा कमी झाल्यास जलसंपदा विभागाच्या वतीने महापालिकेला सूचना केली जाते. पाणी पुरवठ्यासंदर्भात पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला जाणार आहे. पवना धरणात ४५.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ३३.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीपेक्षा या वेळी १२ टक्के पाणीसाठा जास्त आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे यंदा एप्रिलच्या सुरुवातीला धरणात मुबलक पाणीसाठा आहे. असे असले, तरी देखील पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना एकवेळेस पाणीपुरवठा करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.(प्रतिनिधी)
शहराला दिवसाआड पाणीपुरवठा?
By admin | Published: April 18, 2017 2:59 AM