पिंपरी : पवना धरण भरले असतानाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावाने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला असून, महापालिका भवनातराष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला टाळे ठोकले. आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा होता. धरण ९७ टक्के भरले आहे. मात्र, शहरातील एकाही भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. विस्कळीत पाणीपुरवठ्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाला कुलूप लावण्यात आले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी महापौर अपर्णा डोके, मोरेश्वरभोंडवे, मयूर कलाटे, सुलक्षणा शिलवंत, गीता मंचरकर, विनया तापकीर, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, जावेद शेख, समीर मासूळकर, पौर्णिमा सोनवणे, अनुराधा गोफणे आदी उपस्थित होते. त्यानंतर आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.दत्ता साने म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत नगरसेवकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. याची दखल घेऊन महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभागात पाणीपुरवठा विस्कळीत करीत आहेत. यापाठीमागे राजकीय षड्यंत्र आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. नागरिकांना वेठीस धरणे योग्य बाब नाही.’’हे तर पाण्याचे राजकारणराष्ट्रवादी १५ वर्षे सत्तेत होती. मात्र, त्या काळात त्यांना आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणता आले नाही. तसेच, पवना बंद जलवाहिनी योजना पूर्ण करता आली नाही. अद्याप दहा लाख लोकसंख्येप्रमाणे तेवीस लाख लोकसंख्येच्या वाढत्या शहराला पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरातील काही भागांत तांत्रिक कारणाने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याच्यामुळेच परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यावरून राजकारण करू नये. पुढील आठवड्यात आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी साठ्याला परवानगी देण्याबाबत बैठक आहे. त्यात अंतिम निर्णय होईल, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
पाणीपुरवठा विभागास टाळे; धरण भरूनही अनियमित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 3:41 AM