पिंपरी : शहरातील रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील एमएसइडीसीएलचा फिडर शुक्रवारी रात्री नादुरुस्त झाला. त्यामुळे उपसा केंद्रातील पंपिंग बंद झाले असून, शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार आहे.
शहराला पाणी पुरवठा होणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे असे असतानाही शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातच रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील एमएसइडीएलच्या फिडरमध्ये शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे या केंद्रातील विद्युत पुरवठा खंडित होऊन पंपिंग बंद झाले आहे. परिणामी शहराचा आजचा (शनिवार, दि. ५) व उद्याचा म्हणजेच रविवारी (दि. ६) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. एमएसइडीएलकडून फिडरच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
फिडर दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.